छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटणाऱ्यांनीच त्यांचा पुतळा स्थापन केला, उद्धव ठाकरेंचे फटकारे

हिंदुस्थानी नौदलाची सुरुवात छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना करून केली. त्याच्या आठवणीत इथे महाराजांचा पुतळा उभारला. त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान इथे आले. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं पण, त्यांचा महाराष्ट्र लुटणाऱ्यांनीच इथे त्यांचा पुतळा स्थापन केला, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक फटकारे ओढले.

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले की, मी आजपर्यंत अनेक सभा केलेल्या आहेत. बरीच भाषणंसुद्धा केलेली आहेत. पण आज मी इथून भाषण करणार नाही, तर तुमच्याशी बोलणार आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या. मी ज्यावेळेला शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीसमोर उभा राहिलो, क्षणभर मला वाटलं की ते मला विचारताहेत. तुम्ही आमचा नुसता जयजयकार करता, पण आमच्याकडून काही शिकलास की नाही? की नुसताच जयजयकार करतोयस? तो सगळा जो काळ होता, त्याचं वर्णन पुन्हा करत नाही. पण आता मोबाईल आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, टेलिफोन आले. पण त्या काळात फोन किंवा अन्य साधन नव्हतं. अठरापगड जातीजमातींमध्ये विखुरला गेलेला आपला मराठी माणूस. त्याची ताकद ती काय असणार. शस्त्र नव्हती, समोर बलाढ्य शत्रू उभा होता. त्या मुठभर मावळ्यांनिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं केवढं मोठं धाडस होतं. औरंगजेब तिथे बसला होता, अफजलखान आला होता. पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मूठभर जरी असली तरी त्यांची वज्रमूठ एवढी मोठी असते की तिने आग्र्याचं तख्त फोडलं होतं. आता निवडणुका आहेत, त्यावेळी निवडणुका नव्हत्या. अफजलखान भेटीला आला तेव्हा ईव्हीएम नव्हती. त्याने मगरमिठी मारत पाठीवर वार केला, मी जर लेच्यापेच्यासारखा गेलो असतो, तर काय झालं असतं. समोर शत्रू कितीही बलाढ्य असू देत, तयारीनिशी गेलात आणि मनाची जिद्द असेल… भवानी तलवार जरूर, तलवार पेलायला मनगट पाहिजे, जरूर. पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे, ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही? मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारताहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘मी खोटं बोलणारा नाही. ज्या ज्या वेळी मला तुमचं असं दर्शन घडतं, त्यावेळी वाटतं की ही महाराजांनी मला दिलेली भवानी तलवार आहे आणि तीच घेऊन मी उभा आहे. त्याही वेळेला आग्र्यावरून आलेले, आता दिल्लीहून येताहेत. त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं, ते पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची नक्कीच गरज आहे. मी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यात आलेलो नाही. यापूर्वीही आलो आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हा तिथीप्रमाणे शिवजयंती एक मे रोजी आली होती. तेव्हा झेंडा लावायला त्यांच्यासोबत इथे आलो होतो. आज मला वैभवचं कौतुक करायचं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे. पण शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे, त्यांना साजेसं सिंहासन वैभवने करून दिलं.’ अशा शब्दांत त्यांनी आमदार वैभव नाईक यांचं कौतुक केलं.

सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे लोक महाराजांपासून काय शिकले, काहीही शिकलेले नाहीत. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की नौदल दिन इथे साजरा केला. मीही मुंबईहून पाहिला. स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार, ज्याची स्थापना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आपल्या हिंदुस्थानात आरमार नावाचा प्रकार आधी कुठेही नव्हती. त्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्याची आठवण म्हणून पंतप्रधान इथे आले, त्यांनी पुतळा तिथे बसवला. पण इतकं करून मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले. मी आशीर्वादच घ्यायला आलेलो आहे. मी इतका मोठा नाही की काही देऊ शकेन. आम्ही महाराजांना काय देऊ शकतो? महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का, आपण राहिलो तरी असतो का, ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का, मग आम्ही महाराजांना देणारे कोण आहोत? आम्ही महाराजांच्या शौर्याचा एक अंश, तेजाचा अंश जरी घेतला तरी आपण या हुकूमशाही गाडू शकतो, इतकी ताकद त्या अंशात आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘मी मुख्यमंत्री असताना अनेक वादळं कोकण किनारपट्टीवर धडकली. कोकणात वादळ आलं तेव्हा संपूर्ण किनारपट्टीवर भूमिगत वीजवाहक तारा आणि रहिवाशांना निवाऱ्याची सोय करण्याविषयी मी सांगितलं होतं. आता या सोयी आहेत की नाहीत हे तुमचं तुम्हाला माहीत. कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही तर महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं. पंतप्रधान नैसर्गिक आपत्तींमध्ये कधी आले नाहीत. अचानक त्यांना आठवण झाली की छत्रपती शिवाजी महाराज नावाची व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली. त्यामुळे सिंधुदुर्ग हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मत मिळू शकतात. पण आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, लेचेपेचे नाही. आम्हाला तुमची सगळी ढोंगं कळतात. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अंगात भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही.’असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.

‘छत्रपतींच्या स्वराज्यातले त्यांचे साथीदार असलेल्या मावळ्यांचंही पूजन आपण केलं पाहिजे. लाखो जन्म घेतले तरी आपण महाराज तर होऊच शकत नाही. पण मावळ्यांपासून प्रेरणा घेऊन पुढे आयुष्य जगू शकलो तरी ती आपली मोठी कमाई असेल. मुख्यमंत्री होण्याचं माझं स्वप्न तेव्हाही नव्हतं. पण एक जरूर, आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, मी त्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच. एवढंच नाही, लोकसभा निवडणुकीतही मी भाजपला दाखवून देईन की तुम्ही भगव्यात छेद करण्याचं पाप केलेलं आहे. जो छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, लाखो वर्षांची त्याची परंपरा आहे. त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात. तुम्हाला आता छत्रपती शिवरायांचा खरा भगवा काय असतो तो लाल किल्ल्यावर मी पुन्हा फडकवून दाखवतो. यावेळी यांचं बोगस फडकं पुन्हा फडकू द्यायचं नाही. तो भगवा म्हणजे त्यांचा बुरखा आहे.’ असे फटकारेही त्यांनी यावेळी मारले.