दुष्काळ सदृष्य, पालकमंत्री आणि सरकार अदृष्य; उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात

पावसाने ओढ दिल्याने राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. उभी पिकं करपून गेल्याने संकटात सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावर त्यांनी शेतात जाऊन दुष्काळी स्थितीची पाहणी करत शेतकऱ्याशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ”शेतकरी आपला अन्नदाता आहे. या अन्नदात्याला संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडता येणार नाही. मात्र दुष्काळ सदृष्य, पालकमंत्री आणि सरकार अदृष्य अशी सध्या परिस्थिती आहे.”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

” महाराष्ट्र हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. आत्ता पाऊस लागला असला तरी तो किती बरसेल आणि तो बरसल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल, पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. जी पिके करपून गेलेली आहेत, त्या सुकून गेलेल्या कणसामध्ये दाणे भरले जाणार नाहीत. सतंपाजनक गोष्टी आहे की गेल्या वर्षीची नुकसानभरपाई अद्याप दिली गेलेली नाही. त्यानंतर आता या नुकसानीचे पंचनामे कधी होतील. ही नुकसानभरपाई कधी मिळेल, पिकविम्याचे पंचनामे कधी होणार, तो पिकविमा कधी मिळणार. शेतकऱ्यांचं कर्ज कधी फिटणार. काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना 25 टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं आहे. पण 25 टक्के कुठून काढलंत आपण. 100 टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? आपण पाहत आहात की दरवेळेला काही ना काही होतंय. आस्मानी नाहीतर सरकारची सुलतानी. मधल्या काळात कांद्याने शेतकऱ्याला रडवला. आता बोगस बियाणांचा फटका बसतोय. पिक हाताशी येत असताना वरुणराजाने पाठ फिरवली. हे जे काही नुकसान झालं आहे त्याची नुकसानभरपाई तत्काळ दिलीच पाहिजे. जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे तुम्ही कधी करणार आहात. आता पाऊस पडलाय तर सरकार म्हणेल दुष्काळ कुठे आहे. पाणीच पाणी चहूकडे आहे. अशी ही सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती आहे. हे तिनवागंडं सरकार आहे. स्वत:चा कार्यक्रम जोरात करतायत. जाहीरात जोरात करतायत. जाहीरातीवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले तर त्यांना दिलासा मिळेल. आज मी त्यांना दिलासा द्यायाला या भागात आलो आहे. पाऊस आज बरसतोय, तो असाच बरसत राहो, पिण्याच्या पाण्य़ाचा प्रश्न सुटो अशी मी साई चरणी प्रार्थना करतोय’, असे उद्धव म्हणाले.

”सरकारकडून शेतकऱ्यांना टँकर मिळत नाहीए. शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळत नाहीए. अडीच हजार रुपये देऊन टँकर मागवले जात आहे तरीदेखील ना पालकमंत्री फिरकत आहेत ना कृषी मंत्री. पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे. काही काळ आपण वाट बघू त्यानंतर या सरकारला जाब विचारावाच लागले. घटनाबाह्य मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जात असतील. त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याची त्यांनी भेट घ्यावी”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनेकांनी विजबिलाबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. वीज नियमित येत नाही पण विजबीलं नियमित येतात असे शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले. ”सध्या जे एक फुल दोन हाफ आहेत त्यातील एक हाफ असलेल्यांनी आमचं सरकार असताना मध्य प्रदेशमध्ये वीजबिल माफ केल्याचे उदाहरण दिलं होतं. आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. अशी जी काही रेल गाडी आहे त्यांनी आता शेतकऱ्यांचं बिल माफ करावं. या अशा संकटाच्या काळात जर सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नसेल तर कधी करणार. असे अनेक विषय आहेत. आम्ही सरकारला जाब विचारणारच, विमा कपंन्यांकडे शेतकऱ्यांचं गाऱ्हाणी मांडणार. थोडी जरी नितिमत्ता सरकारकडे असेल तर ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. तो आपला अन्नदाता आहे. कोरोना काळात याच अन्नदात्याने आपली आर्थिक स्थिती सांभाळली होती. ही जी सरकार म्हणून लोकं बसली आहेत. त्यांना कामकाज करता येत नाहीए. त्यांनी गद्दारी आमचं सरकार पाडलं असलं तरी जनतेला सामोरे जायला त्यांना तोंड राहिलेलं नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अन्नदात्याचे शाप वाईट असतात

”मुख्यमंत्री दारोदारी फिरतायत. आराम करायला त्यांच्या शेतात जातायत. त्याच हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या शेतात यावं व बघावं. मुख्यमंत्र्यांची शेती पंचतारांकीत असेल पण माझा शेतकरी साधा भोळा आहे. अन्नदाता आहे. अन्नदात्याचे शाप फार वाईट असतात, ते त्यांना भोगायला लागू नयेत असं मला वाटतं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.