‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक, 4 खिडक्यांच्या काचा फोडल्या

vande-bharat-train-stone-thrown-lucknow-to-gorakhpur-train

‘वंदे भारत’ गाड्यांवर दगडफेकीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातनंतर आता यूपीमध्येही दगडफेकीची घटना समोर आली आहे. यूपीतील गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारतावर दगडफेक करण्यात आली असून, खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (22549) ट्रेनवर अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेकीमुळे कोच क्रमांक C1, C3 आणि एक्झिक्युटिव्ह कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. ट्रेनवर अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवासी घाबरले आणि डब्यात एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवानं यामध्ये एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

याआधी गुजरात, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर अशा घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये अनेक राज्यांतून संशयित आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्याचवेळी यूपीमध्येही ट्रेनवर दगडफेकीची घटना समोर आली आहे.

7 जुलैला पंतप्रधान मोदींनी हिरवी झेंडा दाखवला

7 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. गोरखपूर-लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस ही उत्तर प्रदेशात धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे.

गोरखपूर ते लखनौ हे अंतर 299 किलोमीटर आहे. गोरखपूर-लखनऊ वंदे भारत ट्रेन (ट्रेन क्रमांक 22549) गोरखपूरहून सकाळी 06.05 वाजता सुटते. यानंतर सहजनवा, खलीलाबाद, बभनन, मानकापूर, अयोध्या आणि बाराबंकी मार्गे लखनौ जंक्शनला सकाळी 10.20 वाजता पोहोचते. लखनौ-गोरखपूर वंदे भारत ट्रेन (ट्रेन क्रमांक 22550) लखनौ येथून संध्याकाळी 7:15 वाजता सुटते आणि रात्री 11:25 वाजता गोरखपूरला पोहोचते.