
तामिळनाडूची विधानसभा निवडणूक दोन दशकांपूर्वी मारल्या गेलेल्या कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनमुळे चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी आणि मुलगी विद्याराणी या दोघीही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
मुथुलक्ष्मी आणि विद्याराणी या दोघीही वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवित आहेत. 35 वर्षीय विद्याराणी ही व्यवसायाने वकील आहे. तिने तमिलर काची पार्टीकडून मेट्टूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे तर, मुथुलक्ष्मी या तमिलगा वाझवुरिमाई काची पार्टीकडून कृष्णगिरी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. विद्याराणी हिने पीएमके पक्षातून राजकारणात प्रवेश केला होता. ती 2020मध्ये भाजप आणि 2024मध्ये एनटीकेमध्ये गेली होती.
यापूर्वीही लढविल्या निवडणुका
मुथुलक्ष्मी यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढविली आहे. 2006मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. 2024मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात एक लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. विद्याराणी हिने 2024मध्ये कृष्णगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती.

























































