राम मंदिरासाठीचे आंदोलन 1947 च्या स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे! विहिंप नेत्याचे विधान

राम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 सालच्या स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे होते असे विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांनी केले आहे. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले असे शर्मा यांनी म्हटले आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहात असून या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषदेचे शरद शर्मा यांनी याबाबत बोलताना म्हटले की, “राम मंदिरासाठीचा लढा हा स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मोठा होता. कारण धर्म, संस्कृती आणि इतिहासाने जोडले गेलेले एका धर्माचे लोकं यात सामील होते आणि त्यांनी हा लढा उत्तरार्धापर्यंत पोहचवला. यासाठी 500 वर्षे लागली आणि या काळात लाखो लोकांनी आपले प्राण दिले, त्यामुळे हा लढा 1947 पेक्षा मोठा लढा होता असे मानायला हरकत नाही.” एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

मग मी फक्त टाळय़ा वाजवणार काय?

जगन्नाथपुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी राममंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळय़ासाठी अयोध्येला जाण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करून त्या मूर्तीला स्पर्श करतील. मग मी त्या ठिकाणी काय फक्त टाळ्या वाजवायला जाऊ का, असा सवाल त्यांनी केला. मला माझ्या पदाची आणि प्रतिष्ठेची जाणीव आहे. त्यामुळे माझे तिथे जाणे योग्य नाही. यात राजकारणी आपला डाव खेळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

अयोध्येतील श्रीराम मंदिराची वैशिष्ट्य

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक रामनगरी अयोध्येत दाखल होतील. या सोहळ्याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागलेले असताना अयोध्येत निर्माणाधीन असणारे हे मंदिर नक्की कसे असणार? या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे? भाविकांसाठी काय सोयीसुविधा असणार? याची तपशीलवार माहिती श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने गुरुवारी एक्स (आधीचे ट्विटर)वर दिली आहे.

1. अयोध्येतील श्रीराम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले जात आहे.
2. मंदिराची लांबी (पूर्वेकडून पश्चिमेकडे) 380 फुट असून रुंदी 250 आणि उंची 161 फूट असणार आहे.
3. हे मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल.
4. मंदिरामध्ये एकूण 392 खांब असतील आणि 44 प्रवेशद्वार असतील.
5. मुख्य गर्भगृहामध्ये भगवान श्रीरामाचे बालस्वरुप तर पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल.
6. मंदिरामध्ये नृत्यमंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप असतील.
7. मंदिरातील खांबांवर आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत.
8. मंदिरात पूर्वेकडे असणाऱ्या सिंहद्वाराद्वारे 32 पायऱ्या चढून प्रवेश करता येईल.
9. मंदिरप्रवेशासाठी अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची व्यवस्था असणार आहे.
10. मंदिराभोवती एक आयताकृती भिंत असेल. त्याची चारही दिशांची एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असेल.
11. मंदिराभोवती असणाऱ्या उद्यानाच्या चार कोपऱ्यांवर सूर्यदेव, आई भगवती, गणपती आणि भगवान शंकराला समर्थित अशी चार मंदिर बांधली जातील. उत्तरेला अन्नपूर्णेचे तर दक्षिणेला हनुमानाचे मंदिर असेल.
12. मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप असेल.
13. मंदिर संकुलातील प्रस्तावित इतर मंदिरं ही महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील.
14. दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावर भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे जयाटूची मूर्ती बसवण्यात आली आहे.
15. श्रीराम मंदिराच्या बांधकामामध्ये लोखंडाचा वापर केला जाणार नाही, तसेच जमिनीवर काँक्रीटही केले जाणार नाही.
16. मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले
17. मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.
18. मंदिर संकुलामध्ये सांडपाणी प्रक्रियेचा आणि जलशुद्धीकरण प्रक्रियेचा प्लांट असेल. तसेच अग्निशमनदलासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र वॉटर स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे बाह्यसंसाधनावरील अवलंबवत्म कमी राहील.
19. मंदिराजवळच 25000 क्षमतेचे सुविधासाठी केंद्र बांधले जात असून येथे भाविकांच्या सामानासाठी लॉकरची सुविधा, तसचे वैद्यकीत सुविधाही असेल.
20. मंदिर परिसरातच स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसीन आणि उघडे नळ आदी सुविधा असतील.
21. मंदिर पूर्णपणे हिंदुस्थानी परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. येथे पर्यावरण आणि जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात असून यामुळे 70 एकर क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र नेहमी हिरवेगार राहील.