सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन

सिंहगडाच्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. मोरदरवाडी येथे अगदी गावालगत बिबट्याने तळ ठोकल्याचे निदर्शनास आल्याने घेरा सिंहगड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास शिवगंगा परिसरातील घेरा सिंहगडचे मोरदरवाडी मध्ये बिबट्या अगदी सहजपणे वावरताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मोरदरवाडी येथील साहेबराव यादव यांच्या घरातील लहान मुलांनी बिबट्याचा व्हिडिओ घेताच गावात भितीचे वातावरण निर्माण झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मोरदरवाडी गावापासून अवघ्या शंभर दिडशे मीटर अंतरावर बिबट्या दिसताच स्थानिकांनी वनविभागास या बाबतीत माहिती दिली. घेरा सिंहगड ग्रामपंचायत हद्दीतील मोरदरवाडी कल्याण दरवाजाचे दिशेला सिंहगडाच्या कुशीतच आहे. गडाचे चारही बाजूंनी घनदाट जंगल आणि मोठ्या प्रमाणावर डोंगर दऱ्या खोऱ्यांच्या रांगा आहेत. खोल ओढे-नाले, आणि मुबलक अशा जंगलाचे विस्तीर्ण परिसरात बिबट्या व जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसुन येतोय. या वर्षभरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होऊ लागले असुन यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक घेरा सिंहगड ग्रामस्थ घाबरले आहेत. स्थानिकांनी तातडीने वनविभागास या बाबतची खबर दिली. भांबुर्डा वनविभागाचे कर्मचारी व घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले.