पंजाबसमोर कोहलीच किंग; 77 धावांसह विराटचे कमबॅक

आज चिन्नास्वामी स्टेडियमवर किंग इज बॅक. विराट कोहली आपल्या टी-20 फॉर्मात परतला. आपल्याला किंग म्हणू नका अशी चाहत्यांना विनंती करणारा कोहली पंजाबसमोर किंग ठरला. सलामीला येऊन ठोकलेली 77 धावांची खेळी आणि शेवटच्या क्षणी दिनेश कार्तिकने 10 चेंडूंतील 28 धावांच्या फटकेबाजीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) पंजाब किंग्जविरुद्ध 4 चेंडू आणि 4 विकेट राखून आयपीएलमधील पहिला विजय मिळवून दिला. आरसीबीला उद्घाटनीय सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून हार सहन करावी लागली होती.

पंजाब किंग्जच्या 177 धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची बॅट तळपली, पण कर्णधार फाफ डय़ू प्लेसिस (3) आणि पॅमरून ग्रीन (3) आणि ग्लेन मॅक्सवेल (3) या विदेशी दिग्गजांनी माती खाल्यामुळे सारी जबाबदारी विराट कोहलीनेच स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि संघाला 16व्या षटकात 130 धावांवर आणले. 49 चेंडूंत 77 धावा केल्यावर तो बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने 24 चेंडूंतील 48 धावांचे लक्ष्य 3 चौकार आणि 2 षटकार खेचत 4 चेंडूंआधीच गाठले. त्याआधी सलामीला शिखर धवनची 45 धावांची फटकेबाजी आणि शेवटच्या षटकात शशांक सिंगच्या घणाघाताच्या जोरावर पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 6 बाद 176 अशी दमदार मजल मारली होती.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा कर्णधार फाफ डय़ू प्लेसिसने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शिखर धवन जॉनी बेअरस्टॉच्या जोडीने मैदानात उतरला खरा, पण ही जोडी फार धावा जमवू शकली नाही. बेअरस्टॉ 8 धावांवर बाद झाल्यावर धवन आणि प्रभसिमरन सिंगने 55 धावांची भर घातली. प्रभाने 17 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकार खेचत 25 धावा केल्या. त्यानंतर धवन खेळपट्टीवर उभा होता. त्याला अर्धशतकाची संधी होती, पण तो त्या संधीची पन्नाशी करू शकला नाही. लियाम लिव्हिंगस्टोन आणि धवन 98 धावांवर सलग चेंडूवर बाद झाले.

सलग दोन धक्के बसल्यावर सॅम करण आणि जितेश शर्मा यांनी 52 धावांची भर घालून संघाला दीडशतकी टप्पा गाठून दिला. हे दोघेही 19व्या षटकात बाद झाल्यावर पंजाबची धावसंख्या फार मोठी मजल मारेल असे वाटत नव्हते, पण त्याच वेळी अल्झारी जोसेफच्या डावातील शेवटच्या षटकात शशांक सिंगने 21 धावा वसूल केल्या. याच धावांमुळे पंजाब पावणे दोनशेचा टप्पा गाठू शकला आणि आरसीबीसमोर 177 धावांचे आव्हान उभारू शकला.