सचिनच्या विक्रमांचा विराट पाठलाग; 20 वर्षांपूर्वीच्या विक्रमासमीप कोहली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम गेली 27 वर्षे अबाधित आहे. तो विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीसह रचिन रवींद्र, क्विंटन डिकॉक, रोहित शर्मासह डेव्हिड वॉर्नरसारख्या फलंदाजांना आहे. यापैकी कोणता फलंदाज सचिनच्या 673 धावांच्या विक्रमी आकडय़ाच्या पुढे जातो हे पुढील तीन सामन्यांत कळेल.

वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने सर्वप्रथम एका स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा करतान दोन शतकांसह चक्क 167 च्या सरासरीने 333 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या डेव्हिड गोवरने 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये 384 धावा करत त्याला मागे टाकले. मग 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्याच ग्रॅहम गूचने 471 धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. हा विक्रम 1992 मध्ये अबाधित राहिला, पण 1996 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 523 धावा करत तो विक्रम आपल्याकडे खेचला. एका वर्ल्ड कपमध्ये 500 पेक्षा अधिक धावा करणारा सचिन पहिलाच फलंदाज होता. 1999 मध्ये एकही फलंदाज 500 धावा करू शकला नाही. मात्र 2003 साली सचिनने स्वतःचाच विक्रम मोडताना 673 धावा केल्या.

2007 साली सचिनचा हा विक्रम मोडण्याची नामी संधी मॅथ्यू हेडनला चालून आली होती, पण त्याची गाडी 659 धावांवर अडकली. मग 2011 साली कुणीही त्या विक्रमासमीप पोहोचू शकला नाही. श्रीलंकेचा दिलशान तिलकरत्ने 500 धावा करत टॉप स्कोअरर होता. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये मार्टिन गुप्टिलने 547 धावा केल्या. 2019 मध्ये तर अनेक फलंदाज सुपर फॉर्मात होते. पाच शतके झळकावणारा रोहित शर्मा सचिन तेंडुलकरला सहज मागे टाकेल असे वाटत होते, पण तो 648 धावांपर्यंतच पोहोचला आणि हिंदुस्थानचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले. डेव्हिड वॉर्नरनेही 647 धावा केल्या आणि त्यांचा संघही उपांत्य फेरीत हरला.

यंदाही सचिनच्या अबाधित असलेल्या विक्रमाच्या मागे अनेक फलंदाज आहेत. त्यात विराट कोहली सर्वात पुढे आहे. त्याने 594 धावा केल्या असून त्याला केवळ 80 धावांची गरज आहे. तसेच क्विंटन डिकॉक (591), रचिन रवींद्र (565), रोहित शर्मा (501) आणि डेव्हिड वॉर्नर (499) हे चौघेही त्याच मागावर आहेत. गेले 27 वर्षे सचिन एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम राखून आहे. तो विक्रम मोडण्यासाठी एकाच वेळी पाच फलंदाज प्रयत्न करत असल्यामुळे तो मोडला जाण्याची अधिक शक्यता आहे. पण तो कोण मोडतो याची उत्सुकता सर्वांना असली तरी विराट किंवा रोहितच्या नावावर तो विक्रम नोंदविला जावा, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.