IND vs ENG Test- टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या 2 टेस्टमधून बाहेर

हैदराबादमध्ये इंग्लंडशी दोन हात करण्याची तयारी करणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर झाला आहे. वैयक्तीक कारणांमुळे त्याने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या दोन कसोटीतून आपले नाव वगळावे अशी विनंती विराट कोहली याने बीसीसीआयला केली होती. विराटने या संदर्भात कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चाही केली. देशाचे प्रतिनिधित्व करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे, मात्र वैयक्तीक कारणामुळे मी पहिल्या दोन कसोटीसाठी उपलब्ध नसेल असे विराटने कळवले होते.

बीसीसीआयने विराट कोहलीची विनंती मान्य केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे उर्वरित खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील असा विश्वासही बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करून त्याच्या वैयक्तीक कारणाचा अंदाज लावू नये अशी विनंतीही बीसीसीआयने प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांना केली आहे. त्याऐवजी त्यांनी आपले लक्ष टीम इंडियाला पाठिंबा देण्यावर केंद्रीत करावे, असा सल्लाही बीसीसीआयने दिला आहे.

दरम्यान, विराट कोहली याने माघार घेतल्याने त्याच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागेल हे गुलदस्त्यात आहे. निवड समिती लवकरच बदली खेळाडूचे नाव घोषित करेन, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

IND vs ENG Test – रुटच्या निशाण्यावर तेंडुलकरचा विक्रम, विराटलाही मोठी संधी