Vistara Pilot Crisis: अनेक उड्डाणं रद्द, प्रवाशांना मनस्ताप

 

वैमानिकांच्या अनुपलब्धतेमुळे विस्तारा विमान कंपनीच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून मंगळवारी सकाळी प्रमुख शहरांमधून निघणारी किमान 38 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईहून 15, दिल्लीहून 12 आणि बेंगळुरूहून 11 उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्तारा ची 50 उड्डाणं रद्द करण्यात आली होती. तर 160 उड्डाणं उशिराने झाल्याची माहिती मिळते आहे. विमानतळावर ताटकळत बसावं लागल्याबद्दल प्रवाशांनी तक्रारी देखील केल्या आहे. काही प्रवाशांनी आपल्याला झालेल्या विलंबाबद्दल विमानकंपनीवर टीकेची झोड उठवली होती. एनडीटीव्हीनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

विस्तारानं सोमवारीच एका निवेदन जारी करत, कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता यासह विविध कारणांमुळे विमानं रद्द करावी लागणे आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दलची कबूली देतानाच आणि प्रवाशांना योग्य सेवा कशी देऊ यासाठी चिंता देखील करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रवाशांना अधिक उत्तम सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

विमान कंपनीनं असंही म्हटलं आहे की उपलब्ध वैमानिकांच्या संख्येनुसार विमानसेवा सुरळीत करण्यासाठी उड्डाणांची संख्या तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

B787-9 ड्रीमलाइनर आणि A321neo सारखी मोठी विमाने निवडक देशांतर्गत सेवेसाठी किंवा अधिक संख्येने ग्राहकांना सामावून घेण्यासाठी, शक्य असेल अशा ठिकाणी देण्यात आली आहेत. शिवाय, ग्राहकांना परतावा देत असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.