आजपासून मुंबई, ठाणे, भिवंडीची पाणीकपात मागे , पिसेमधील तीन ट्रान्सफॉर्मर, 20 पंप कार्यरत

मुंबई महापालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे क्षतिग्रस्त झालेले तीन ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाले असून त्या आधारे चालणारे 20 पंपही पूर्ण क्षमतेने सुरू झाले असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि भिवंडीतील 15 टक्के पाणीकपात बुधवार, 6 मार्चपासून मागे घेण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला 26 फेब्रुवारीला रात्री आग लागल्याने यंत्रणा बाधित झाली होती. त्यामुळे मुंबईसह ठाणे, भिवंडीत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारित 20 पंप सुरू करण्यात आले. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. त्याचबरोबर पिसे उदंचन पेंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण पेंद्रही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे.