मुंबई, ठाणे आणि भिवंडीत आजपासून 5 मार्चपर्यंत 15 टक्के पाणीकपात

मुंबई महापालिकेच्या भिवंडी येथील पिसे जलउदंचन केंद्रात सोमवारी ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीचा फटका मुंबईसह ठाणे, भिवंडीच्या पाणीपुरवठय़ाला बसला आहे. पिसे केंद्रातील आगीमुळे नुकसान झालेले दोन ट्रान्सफार्मर सुरू करण्यात यश आले असून त्यामुळे 15 पंप सुरू झाले आहेत. मात्र तिसरा ट्रान्सफार्मर सुरू होण्यास 5 मार्चपर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी आणि नगर बाह्य विभागात पाणीपुरवठय़ात आज मध्यरात्रीपासून 5 मार्चपर्यंत 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला सोमवारी संध्याकाळी लागलेली आग रात्री 10 वाजता नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर रात्री 12च्या सुमाराला एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता दुसऱया ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तोदेखील सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर 7 पंप सुरू करण्यात आले. सध्या पिसे केंद्रातील 20पैकी सुमारे 15 पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. मात्र तिसऱया ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून तो सुरू करण्यासाठी 5 मार्चपर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे.

पाली हिलमधील जलवाहिनी बदलणार; वांद्रे, खारमध्ये पाणीपुरवठय़ावर 11 मार्चपर्यंत परिणाम
पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा करणाऱया पाली हिल जलाशयाची जलवाहिनी बदलण्यात येणार असल्यामुळे वांद्रे आणि खार पश्चिम परिसरात 11 मार्चपर्यंत 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. जलवाहिनी बदलण्याचे काम आजपासून सुरू झाले असून ते 11 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार परिसराला पाली हिल जलाशयातून पाणीपुरवठा होतो. पाली हिल जलाशय जुने झाले असून जलाशयातून पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्याही जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनी बदलणे आणि मजबुतीकरणाचे काम जलअभियंता विभागाकडून आजपासून हाती घेण्यात आले आहे. हे काम सोमवार 11 मार्च या कालावधीत होणार आहे. त्यामुळे वांद्रे पश्चिम व खार पश्चिम परिसरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

डीप क्लिनिंगच्या नावाखाली पाण्याची नासाडी थांबवा! आदित्य ठाकरे संतापले
वरळी सी फेसवर महापालिकेच्या एका टँकरमधील पाणी कामगार रस्त्यावर फवारण्याऐवजी डिव्हाईडरवर फवारत असल्याचा व्हिडिओ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसारित करून राज्य सरकार आणि महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे. मुंबईत सध्या पाणी कपात सुरू आहे. मात्र डीप क्लिनिंगच्या नावाखाली राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिका पाण्याची अशी नासाडी करत आहे. पाण्याच्या एका टँकरची किंमत अशी मातीमोल ठरत आहे. टँकरचे पाणी डिव्हाईडरवर फवारणारा हा कामगार नक्की काय करत आहे ते मला सांगा. डीप क्लिनिंगची मूर्खपणाची कल्पना राबवून राज्यातील खोके सरकार किती अकार्यक्षम आहे तेच दाखवून देत आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

या भागात 10 टक्के कपात
एच पश्चिम विभागातील कांतवाडी, शेरली राजन, गझधर बंध भाग आणि दांडपाडा, दिलीप कुमार झोन, कोल डोंगरी झोन, पाली माला झोन आणि युनियन पार्क झोन, खार (पश्चिम), वांद्रे पश्चिमेच्या काही भागात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.