नात्याला काळिमा फासणारी घटना! नव्या मोबाईलसाठी दाम्पत्याने 8 महिन्याच्या बाळाला विकले

पश्चिम बंगालमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईवडिलांनी नवा फोन खरेदी करण्यासाठी आपल्या 8 महिन्याच्या बाळाची विक्री केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर मोबाईल घेऊन उरलेल्या पैशांमधून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला.

शेजाऱ्यांनी जेव्हा पती-पत्नीच्या हातात मोबाईल फोन पाहिला आणि त्यांचे बाळही बरेच दिवस दिसत नसल्याने त्यांना संशयास्पद वाटले. त्यांनी त्याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता त्यांना कळले की, त्या दाम्पत्याने आपल्या बाळाला विकले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याला एक मुलगी आहे. मुलाला विकल्यानंतर दोघंही दीघा आणि मंदारमणि समुद्र किनाऱ्यांवर फिरायला गेले. दाम्पत्याने दीड महिन्यांपूर्वी मुलाला विकले होते. रविवारी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलीसांनी या घटनेचा छडा लावला आणि दाम्पत्याला ताब्यात घेतले. जयदेव घोष असे आरोपी पित्याचे नाव आहे. पोलिसांनी विकलेल्या मुलाची सुटका केली आहे.

दाम्पत्याचे शेजारी लक्ष्मी कुंडू यांच्या माहितीनुसार, जयदेव आणि त्याच्या बायकोने आपल्या मुलाला 2 लाखांमध्ये विकले होते. याच पैशांमधून दोघांनी दोन नवे मोबाईल घेतले आणि उरलेल्या पैशांमधून मौजमजा केली. दोघांनाही अमली पदार्थाचे व्यसन आहे. पोलिसांनी बाळाची खरेदी करणाऱ्या प्रियांका घोष नावाच्या महिलेलाही अटक केली आहे. जयदेव याचे वडिल कामई चौधरी यांनी सांगितले की, मला मुलाने सांगितले की, मुलाला त्याच्या मामाकडे सोडण्यात आले आहे. मी सांगू शकत नाही की, मुलाला का आणि कोणाला विकण्यात आले. मुलाला विकल्यानंतर माझा मुलगा आणि सून दीघा आणि मंदारमणि येथे फिरायला गेले होते.तसेच ते तारापीठ काली मंदीरातही गेले होते.