पंढरपुरात नियोजनाचा बोजवारा; कोट्यावधी रूपयांचा निधी जातो कुठे?

>> सुनील उंबरे

पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान |
आणिक दर्शन विठोबाचे ||

या संत उक्तीप्रमाणे पंढरीनगरीत आल्यानंतर निर्मळ चंद्रभागेत स्नान आणि देवाचे सुलभ दर्शन व्हावे, एवढीच अपेक्षा वारकरी, भाविकांची असते, पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही. मंत्रालयापासून पंढरपूरनच्या नगरपालिकेपर्यंत वारी नियोजनाच्या बैठकांचा खो-खो सुरू असतो. कागदावर या नियोजनाचे संकल्पचित्र रंगवण्यात येते. मात्र, अंमलबजावणी काही होत नाही. याचा अनुभव यावर्षी ठळकपणे आला. मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली. मात्र, अत्यावश्यक सुविधांची बोंबाबोंब झाली. भाविकांवर शासन आणि मंदिर समिती व्यवस्थापनाच्या नावाने निषेधाच्या घोषणा देण्याची वेळ आली. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आणि आषाढी वारीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो; पण हा निधी नेमका जातो कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्य वारकऱ्यांना प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या त्रासाबद्दल तो फारसा बोलत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा सोशिक आहे. वारकऱ्यांच्या याच भाबडेपणाचा गैरफायदा मंदिर व्यवस्थापन, राज्यकर्ते आणि प्रशासनकर्ते घेताना दिसतात. अलीकडे वारी – म्हणजे पैसे मिळविण्याची पर्वणी म्हणूनच याकडे पाहिले जात आहे. सेवेपेक्षा मेवा कसा अधिक मिळेल, यासाठी प्रशासनातील प्रत्येक विभागाची स्पर्धा सुरू असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खात्याचे देता येईल. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरमध्ये तृणधान्य महोत्सव आणि शेतकरी मेळावा घेण्याचा घाट घातला गेला. यासाठी सात कोटी रूपयांची तजवीज केली. पंढरपूरमध्ये येणारा वारकरी बहुसंख्येने शेतकरी वारकरी बहुसंख्येने शेतकरी आहे. वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी एकत्र येतात त्यानिमित्ताने मेळावा, प्रदर्शन घेऊन वारकऱ्यांच्या शेतीज्ञानात भर टाकण्याचा हा उपक्रम असल्याचे भासविले जात होते. मात्र, या निधीचा दुरुपयोग, उधळपट्टी होती. ‘दै. ‘सामना’ने हे षड्यंत्र वेळीच उघडकीस आणून भंडाफोड केल्याने सत्तार आणि त्यांच्या खात्याचे मलिदा मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. हे एक प्रकरण उजेडात आले. मात्र, वारीच्या आणि विकासाच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळण होते. या निधीचा ना वारकऱ्यांना लाभ होतो. ना पंढरपूरकरांना… त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही.

दर्शन मंडप उभा करावा

पंढरीचा पांडुरंग हा असा एकमेव देव आहे की, ज्याच्या मूर्तीला हाताने स्पर्श करून किंवा डोके मूतींच्या पायावर ठेवून दर्शन घेण्याची प्रथा आहे. शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्यांचा देव म्हणून पांडुरंगाची ख्याती आहे. त्यामुळे या भाविकांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून फारशा हायफाय अपेक्षा नाहीत. वारीच्या कालावधीत दर्शन रांगेत मोठी गर्दी होते. देवाच्या दर्शनासाठी साधारण 25 ते 30 तास रांगेत उभे राहावे लागते. ऊन, वारा, पाऊस, अस्वच्छता आदी समस्यांचा सामना यावेळी करावा लागतो. ही गैरसोय दूर व्हावी, सुसज्ज असा दर्शनमंडप उभा करावा, त्यामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. देवाच्या पायापासून ते गोपाळपूर पत्राशेडपर्यंतचें अंतर लक्षात घेतले, तर हे अंतर एक किलोमीटरदेखील भरत नाही. भाविकाला देवाच्या पायाजवळ येण्यासाठी दोन दिवसांचा अवधी का लागतो, यावर मंदिर व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. मात्र, सामान्य भाविकांपेक्षा व्हीआयपी भाविकांच्या दर्शनात अधिक रस असलेले लोक समितीमध्ये कार्यरत असल्याने, सुलभ आणि तत्पर दर्शनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. दर्शनरांगेतील घुसखोरी आणि व्हीआयपी दर्शन व्यवस्था सामान्य भाविकांच्या समस्येत भर टाकत आहे. यावर्षी आषाढीवारीत दर्शनरांगेत प्रचंड गोंधळ झाला. भाविकांचा संताप अनावर झाला आणि मंदिर समितीच्या नावाने निषेधाच्या घोषणा देऊन रोष त्यांनी व्यक्त केला.

चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न
पंढरपूरमध्ये आलेले बहुतांश भाविक हे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करतात. वारकरी संप्रदायात स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त पाणी असले तरी वारकरी त्या अस्वच्छ पाण्यामध्ये देवाच्या श्रद्धेपोटी अंघोळ करतात. नदीपात्राची वेळोवेळी स्वच्छता आणि स्नानासाठी पुरेसे पाणी ठेवणे स्थानिक प्रशासनाला डोईजड नाही. मात्र, या समस्येकडे गांभीर्याने कोणीही पाहत नाही. वारी आली की प्रशासन जागे होते. केवळ वारी मर्यादित करण्याचे हे काम नाही. येथे दररोज 20 ते 30 हजार भाविकांची वर्दळ आहे, सुट्टीच्या दिवशी एक लाख भाविक भेट देतात. भाविकांची चंद्रभागेविषयी असलेली आस्था पाहाता नदीचे पावित्र्य राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

निरुपयोगी विकास…

विकासाच्या नावाखाली पंढरपूरमध्ये आजवर हजारो कोटी रुपये खर्ची पडले. आहेत. मात्र, आजही साठ टक्के निकृष्टदर्जाचे आणि निरुपयोगी असल्याचे। दिसून येईल. एकावेळी शहरात 100 कोटींची शौचालये उभारली; पण 100 पैकी 50 कोटींची शौचालये आज धूळखात पडून आहेत.

सहा भाविक ठार झाले तरी गुन्हा दाखल नाही

चंद्रभागा नदीवर घाटांची उभारणी केली. कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण एक वर्षांत या घाटांची दुरवस्था झाली. धक्कादायक बाब म्हणजे या घाटाची भिंत अंगावर पडून सहा भाविक ठार झाले. या दुर्दैवी घटनेला अद्यापि कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. एवढी मोठी दुर्घटना निकृष्ट काम केल्याने झाली. मात्र, कोणाच्या चुकीमुळे सहाजणांना प्राण गमवावा लागला हे काही अद्यापि समोर आले नाही.