शरद पवारांवर टीका केल्याशिवाय तुमची राजकीय पोळी भाजली जात नाही; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांची विखेंवर टीका

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर टीका केली, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. त्यांनी आधी आपण कुठे होतो याचे आत्मपरीक्षण करा आणि नंतरच टीका करा, असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी विखे यांना लगावला आहे. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय तुमची राजकीय पोळी भाजली जात नाही, असेही फाळके म्हणाले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार राजेंद्र फाळके यांनी घेतला आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या वेळेला तुमचे नुकसान होते, तुमची पडझड होते. त्यावेळेला तुम्हाला शरद पवार यांची आठवण होते. पद्मश्रींनी काढलेला कारखाना जेव्हा अडचणीत आला, तेव्हा तुम्हाला अप्पासाहेब पवार यांना या ठिकाणी बोलवावे लागले आणि हा कारखाना संकटातून बाहेर काढण्याची वेळ आली. त्यावेळी तुम्हाला शरद पवार यांनीच मदत केली, याची आठवण फाळके यांनी करून दिली. सुपा एमआयडीसी शरद पवार यांनी आणली नसती तर त्याचे काय हाल झाले असते हे तुम्हाला सांगता येणे कठीण आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आणल्या, तेथील औद्योगिक वसाहती चालल्या नाही ,अशी टीकाही फाळके यांनी केली.

शरद पवार यांनी येथे आयात उमेदवार आणला, या वक्तव्यावरही फाळके यांनी पलटवार केला. अगोदर आपण व आपले चिरंजीव हे काँग्रेसमध्ये होता, त्याची आठवण आपल्याला आहे का, काँग्रेस पक्षातूनच सुजय विखे हे भाजपमध्ये आले व ते खासदार झाले. त्यामुळे अगोदर आपण आपले आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही फाळके यांनी विखे यांना यावेळी लगावला.