रील बनवण्याचे व्यसन लागलं, पतीने मोबाईल काढून घेतला म्हणून पत्नीची आत्महत्या

मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. पण सध्याच्या जगात या तीन महत्वांच्या गरजांव्यतिरिक्त मोबाईलचा सुद्धा मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये समावेश करावा लागत आहे. एकवेळ अन्न, वस्त्र आणि निवारा नसला तरी चालेल पण मोबाईल असणं खूप गरजेचे झाले आहे. लहानांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल सहज पाहायला मिळतो. पण जेव्हा याच मोबाईलचे व्यसन लागते तेव्हा मात्र गंभीर समस्या निर्माण होते. अशाच एका प्रकरणात मोबाईलच्या व्यसनामुळे एका महिलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.

सदर घटना छत्तीसगडमधील दुर्घ जिल्ह्यातील भिलाई येथे घडली आहे. कमलला (बदललेले नाव) मोबाईलचे व्यसन होते. इन्स्टाग्रामवर कमल सतत रील बनवत असे. एकप्रकारे रील बनवण्याचे व्यसनच तिला लागले होते. तिच्या पतीला ही गोष्ट खटकत होती. त्यामुळे त्याने तिचा मोबाईल काढून घेतला आणि त्यांच्यात यावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यावर कमलचा मोबाईल घेऊन पती शुक्रवारी घरातून निघून गेला. या दरम्यान कमलने रागाच्या भरात आत्महत्या केली. काही वेळाने तिच्या पतीला पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी दुर्गेश शर्मा यांनी सांगितेली की, या घटनेमागील कारण मोबाईल फोनशी संबंधीत असल्याचे दिसून आले आहे. महिलेचा मृतदेह लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपासासाठी महिलेने आत्महत्या केलेली खोली बंद करण्यात आली आहे.