पत्ता विचारल्याने Blinkit च्या डिलिव्हरी बॉयवर महिलेचा चाकू हल्ला

दिल्लीतील द्वारका सेक्टर-23 मधल्या एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेला पत्ता विचारल्याने तिने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवर चाकूने हल्ला केला आहे. महिलेने तरुणाला तीन ते चार वेळा चाकूने भोसकण्याचा प्रयत्न केला आहे. डिलिव्हरी बॉयच्या आरडाओरड्यामुळे आजूबाजूचे जमा झाले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तिने चाकू दाखवून पोलिसांनाही धमकावले. अखेर स्थानिक महिलांच्या मदतीने पोलिसांनी या महिलेकडून चाकू काढून घेतला. मात्र यानंतरही तमाशा थांबला नाही. महिलेने पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून घेत पोलीस पीसीआर व्हॅनसह काही वाहनांची तोडफोड करायचा प्रयत्न केला.

महिला पोलिसांनी आरोपी महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी महिलेने महिला पोलिसांचे केस ओढले आणि त्यांच्याशीही बाचाबाची केली. बऱ्याच वेळावंतर. आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. हा सगळा ड्रामा सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही 42 वर्षांची असून ती सोसायटीत भाड्याच्या घरात एकटीच राहते. याआधीही आरोपी महिलेने इतरांसोबत वादावादी आणि हाणामारीचे प्रकार केले आहेत. मात्र पोलीस तक्रार न झाल्याने तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

या महिलेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव गोलू असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याने पोलिसांना सांगितले की तो ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. 18 ऑगस्टच्या रात्री तो डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. गोलूने डीडीएच्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा पत्ता विचारला, याचा राग आल्याने त्या महिलेने गोलूला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. गोलूला काही समजण्यापूर्वीच महिलेने चाकू काढून त्याच्या हातावर वार केला. महिलेने गोलीच्या स्कूटरचे टायर चाकूने पंक्चर करण्याचाही प्रयत्न केला. तिने या स्कूटरची चावी काढून झुडपात फेकून दिली होती. या महिलेने रस्त्याच्या कडेला पडलेली वीट उचलली आणि त्याने गोलूची स्कूटर फोडायला सुरुवात केली. गोलूने आरडाओरडा करायला सुरुवात करताच सोसायटीतील मंडळी धावून आली. त्यांनी पोलिसांनाही बोलावले. पोलिसांनाही या महिलेने मारहाण केली असून बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला शांत करण्यात पोलिसांना यश आले.