लेख – सेला टनेल : राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

नवीनतम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून बांधण्यात आलेला सेला बोगदा बर्फाच्या रेषेच्या खूपच खाली आहे, ज्यामुळे बर्फ पडून रस्ता बंद होणार नाही. त्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेच्या भारताच्या विरुद्ध असलेल्या चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडबरोबर मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याची क्षमता वाढेल. भारतीय लष्कर वेगाने पुढे पोचेल, चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकेल. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा बोगदा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी इटानगर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. तवांगला जोडणारा सेला बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ ) बांधलेला हा बोगदा संरक्षण दलांची सज्जता वाढवेल तसेच सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल. बोगदा तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. हा बोगदा बीआरओने अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱया रस्त्यावर फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलिपारा – चरिदुआर – तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल .

सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्टय़े समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही, तर देशासाठी सामरिकदृष्टय़ादेखील तो महत्त्वाचा आहे. बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आणि 1एप्रिल 2019 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत बीआरओने 8,737 कोटी रुपये खर्चून विक्रमी 330 पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत.

सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगदा आहे. सेला पासच्या 400 मीटर खाली स्थित सेला बोगदा हिवाळ्याच्या हंगामातही एक महत्त्वाचा रस्ता सुरू ठेवतो. बोगदा भारतीय सैन्याला चीन-भारत सीमेवर सैन्य, शस्त्रs आणि यंत्रसामग्री जलद हलवण्यास मदत करतो. सेला ऱप् 13 शी एका नवीन 12.4 किमी रस्त्याने जोडलेले आहे, ज्यामुळे दिरांग आणि तवांगमधील अंतर 10 किमीने कमी केले आहे. बीआरओने दोन बोगदे बनवले आहेत. साधारण 13 हजार 800 फूट उंचीवर सेला पासच्या खाली दोन बोगदे बनवले गेले. एक बोगदा 1790 मीटर लांबीचा, तर दुसरा 475 मीटर लांबीचा असून 980 मीटर लांबीचा आपत्कालीन मार्गही या बोगद्याच्या ठिकाणी बांधला जात आहे. दोन बोगदे एकत्रितपणे सेला खिंडीच्या खालून जातात .

भुतान आणि तिबेटच्या (चीन) सीमेवरील एक मोठे शहर आणि लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण म्हणून तवांगची ओळख आहे. हिवाळ्यात काही महिने तवांगला रस्त्याने पोहोचणे अशक्य होते. बर्फ पडल्यामुळे तवांगकडे जाणारा ‘सेला पास’ काही महिने बंद असायचा. आता दररोज सुमारे 4 हजार सैन्य आणि नागरी वाहने या बोगद्याचा वापर करतील. बोफोर्स तोफांसह सर्व प्रकारची जड लष्करी वाहने आणि लष्करी हार्डवेअरच्या हालचालींना बोगद्याचे परिमाण सपोर्ट करेल. हा मोक्याचा बोगदा वर्तक प्रकल्पांतर्गत बीआरओद्वारे बांधला गेला. बोगदा तेजपूर येथील भारतीय सैन्याच्या IV कॉर्प्स मुख्यालयापासून तवांगपर्यंतच्या प्रवासाची वेळ किमान 10 किमी किंवा 1 तासाने कमी करेल . बीआरओ भारत-चीन वास्तविक नियंत्रण रेषेवरील संगेस्टर त्सो (तवांगच्या उत्तरेकडील) ते बुमला पासपर्यंतचा रस्ता सुधारत आहे.

हिवाळ्यातील अतिवृष्टीमुळे सेला खिंडीत प्रचंड बर्फ साचतो. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. आता सेला बोगद्यामुळे तवांगकडे जाणारा रस्ते प्रवास अधिक सुरक्षित होईल, पण त्यापेक्षा हिवाळ्यातही तवांगशी संपर्क ठेवणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत सीमावर्ती भागात रस्ते वाहतुकीचे जाळे मजबूत करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. सेला बोगदा हा त्याच कामाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सेला बोगद्यामुळे धोकादायक बर्फाच्छादित सेला बायपास करून प्रवाशांसाठी एक सुरक्षित पर्याय मिळेल. हा बोगदा तवांगच्या पर्यटन क्षमतेत भर घालेल आणि अधिक पर्यटकांना आकर्षित करेल आणि तवांग हे ईशान्य प्रदेशातील अधिक लोकप्रिय ठिकाण बनवेल.

– 1962च्या चीन-भारत युद्धादरम्यान महावीर चक्र पुरस्कार विजेते जसवंतसिंग रावत यांनी सेला आणि नुरा नावाच्या दोन स्थानिक मोनपा मुलींच्या मदतीने या पर्वतीय खिंडीत चिनी सैन्याला रोखले. युद्धात नंतर सेला मारली गेली आणि नुरा पकडली गेली.रावत यांनी शत्रूला 72 तास रोखून धरले. नंतर चीनला कळले की, ते फक्त एका शूर लढाऊ भारतीय सैनिकाबरोबर सामना करत आहेत. त्यानंतर चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात रावत मारले गेले. भारतीय सैन्याने जसवंतसिंग यांचे जसवंतगढ युद्ध स्मारक बांधले आणि खिंड, बोगदा आणि तलावाला सेला मुलीच्या बलिदानासाठी ‘सेला’ नाव देण्यात आले. सेला बोगद्याच्या उत्तरेस आणि जंगच्या पूर्वेस 2 किमी अंतरावर असलेल्या नुरानांग धबधब्याला ‘नुरा’ हे नाव देण्यात आले आहे.