कथा एका चवीची- कुरकुरीत खाखरा

>>रश्मी वारंग

 

दिवसेंदिवस डाएट फूडचं महत्त्व वाढत असताना आपल्या पातळ रूपासह पौष्टिक म्हणून नावारूपाला आलेला पदार्थ म्हणजे खाखरा. या पारंपरिक पदार्थाची ही कुरकुरीत कहाणी.

खाखरा हा काही खास निगुतीने तयार होणारा पदार्थ वगैरे बिलकुल नाही. स्वयंपाकघरात गरजेपोटी तयार होणाऱया पदार्थाचं अधिक नेटके रूप म्हणजे खाखरा! गुजराती आहारात ‘रोटली अने फुलका’ यांचं महत्त्व खास आहे. कुठल्याही घरात जेवणाच्या वेळेआधी डोकावल्यास मुबलक तुपाची धार सोडत रोटली शेकणारी स्त्राr आणि बाजूला रोटय़ांची चळत हे दृश्य सहज दिसते.  कुण्या गुर्जर बेनकडून रोटी शेकता शेकता जरा अधिक कुरकुरीत झाल्या असाव्यात. त्या घरातील मंडळींना आवडल्या असाव्यात आणि त्यातून हा खाखरा जन्माला आला असावा असा एक अंदाज बांधला जातो. थोडक्यात, खाखरा म्हणजे टाकाऊतून टिकाऊ धर्तीवर जन्माला आलेला पदार्थ.

‘खाखरा’ शब्दाचा उगम तितकासा स्पष्ट नाही. कडक फुलका, पापड रोटी या नावानेसुद्धा खाखरा ओळखला जातो. ‘खाखरा’ शब्दाचा एक संदर्भ असा की, ‘खँखरा’ नामक रुंद तोंडाचा भांडय़ाचा एक प्रकारही आहे, तर दुसरा अर्थ होतो पातळ. खाखऱयाची पातळ देहयष्टी पाहता त्या अर्थाने हा शब्द वापरला गेल्याची शक्यता जास्त वाटते.

खाखरा बनवणे तसे कठीणच काम. साधे पीठ भिजवतो तसेच कणीक किंवा मटकीचे पीठ भिजवून त्यात मसाले घालून योग्य तापमानावर खाखरा शेकणे ही कला आहे. कमी शेकला तर खाखरा कुरकुरीत, नाहीतर नरम बनणार आणि अति शेकला तर करपणार. पण महाराष्ट्रातील घरात जशा फेण्या, कुरडय़ा बनतात तसा गुजराती घरात खाखरा बनतो. अनेक स्त्रियांना या खाखऱयाने रोजगार दिला आहे.

खाखरा गुजराती घरातच नाही तर देशविदेशातही चवीने खाल्ला जातो. व्यापाऱयाच्या निमित्ताने जगभरात पसरलेल्या या समाजाचे वैशिष्टय़ म्हणजे ते कुठेही राहिले तर सोबत आपली खाद्यसंस्कृती बाळगतात. ढोकळा, फाफडा जसा त्यांनी सोबत नेला, तसाच खाखरासुद्धा सोबत बाळगला. खाखऱयाची ही उपलब्धता आणि कमी कॅलरीज हे वैशिष्टय़ लक्षात घेता अलीकडच्या काळात त्याला मिळालेली डाएट फूड ही ओळख खास आहे. तेल, तिखटपणाचा कमी वापर होत असल्याने अनेकदा आहार तज्ञ सकाळच्या नाश्त्यामध्ये खाखऱयाचा समावेश करतात.

याशिवाय खाखऱयावर झालेले वेगवेगळे प्रयोगही महत्त्वाचे. पारंपरिक मेथी खाखरा, मसाला खाखरा, जिरा खाखरा यांच्यासह पावभाजी खाखरा, पाणीपुरी खाखरा, शेजवान खाखरा, डोसा खाखरा अशा आधुनिक स्वादांची दिलेली जोड जुन्याच नव्हे, तर नव्या पिढीलाही खाखऱयाशी बांधून ठेवते. फास्ट फूड, जंक फूडचे आाढमण होऊनही खाखरा गुर्जर समाजाच्या आहाराचा आजही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे.

गुजराती घरातून बाहेर पडत मोबाइल किंवा पॉकेट आकाराच्या पॅकेजिंगमधून डाएट फूड बनलेला खाखरा म्हणजे मधल्या वेळचे पौष्टिक खाणे. त्यामुळे गुर्जर बांधवच नाहीत, तर सगळेच खाखरा फॅन म्हणतात, चाय पिवानु… खाखरा खावानु… एटले मज्जानी लाईफ…

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)