Gurucharan Singh Missing : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम सोढी 5 दिवसांपासून बेपत्ता

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ यामध्ये रोशन सिंग सोढी हे पात्र साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग (वय – 50) बेपत्ता झाला आहे. गेल्या 5 दिवसांपासून गुरुचरण याचा थांगपत्ता लागत नसल्याची तक्रार त्याचे वडील हरगीत सिंग यांनी दिल्लीतील पालम पोलीस स्थानकामध्ये दिली आहे.

‘माझा मुलगा गुरुचरण सिंग 22 एप्रिलला सकाळी 8.30 वा. मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. तो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेला, पण तो मुंबईला पोहोचला नाही व अजूनही घरीही परतलेला नाही. त्याचा फोनही लागत नाहीयस असे त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

या तक्रारीनंतर पोलिसांनी गुरुचरण सिंग याचा शोध सुरू केला आहे. पोलीस आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. मात्र अद्याप पोलिसांना कोणताही धागादोरा हाती लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांसह चाहत्यांचीही चिंता वाढली आहे.

दरम्यान, गुरुचरणचा शोध लवकरच लावू असे आश्वासन मला एसएचओने फोन कॉल करून दिले आहे. आशा आहे की तो ठीक असावा. तो जिथे असावा तिथे चांगला आणि खुश असावा, असे हरगीत सिंग म्हणाले. त्याची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात होती. आता तिला घरी आणले असून ती ठीक आहे. आम्ही गुरुचरणबाबत सकारात्मक विचार करत असून कायदा आणि देवावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत गुरुचरण सिंह हा रोशन सिंग सोढी हे पात्र साकारत होता. प्रेक्षकांना त्याच्या संवादफेकीचा अंदाज भावत होता. या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला होता. सोशल मीडियावर त्याच्या संवादाचे मिम्सही बनत होते. मात्र अचानक त्याने ही मालिका आणि टीव्ही इंडस्ट्रीलाही रामराम केला. आईच्या तब्येची चिंता त्याला सतावत होती. त्याने मुंबई सोडली आणि पंबाजमध्ये निघून गेला. त्याने ‘तारक मेहता का..’ मालिका सोडली तेव्हा असेही वृत्त आले होते की असित कुमार मोदी यांनी त्याचे पैसे थकवले आहेत. यासोबत दोघांमध्ये अन्य काही कारणामुळे वादही झाला होता.