कपात नाही, पण पाणी जपून वापरा महापालिका म्हणते, पाणी पेल्यानेच प्या!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मिळून 2 लाख 38 हजार 552 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 16.48 टक्केच पाणी शिल्लक आहे. मुंबईला दररोज होणारे 3850 दशलक्ष लिटर पाणीसाठा पाहता सध्याचे उपलब्ध पाणी 31 जुलैपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने पाणीकपात केली जाणार नसली तरी मात्र कडाक्याच्या उन्हामुळे वेगाने होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के कमी साठा असल्यामुळे पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा, पेल्यानेच पाणी प्या असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांमध्ये गतवर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा व अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठय़ावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे 31 जुलै 2024 पर्यंत पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये. असे असले तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमधील उपलब्ध पाणीसाठा व नियोजन यासंदर्भात आयुक्तांनी आज बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त चक्रधर कांडलकर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे उपस्थित होते.

– हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यासाठी सध्या अनुपूल स्थिती आहे. मात्र गेल्या काही वर्षांप्रमाणे पावसाने जूनमध्ये ओढ दिल्यास पाणीसाठा 10 टक्क्यांच्या खाली आल्यास 10 ते 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पाण्याची काटकसर आणि पाणी वाया जाऊ दिले नाही तर दोन तृतीयांश पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांसह हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे पालन, पाण्याची काटकसर करावी.
– भूषण गगराणी, आयुक्त