इस्रायली सैन्याचे रणगाडे राफात घुसले, केरेम शालोम सीमा चौकी परिसरावर ताबा

मित्रदेशांचे इशारे धुडकावून लावत इस्रायलने राफा शहरात भूदल आणि रणगाडे घुसवले आहेत. राफा आणि इजिप्तच्या सीमेवरील केरेम शालोम क्रॉसिंग चौकीवरही गाझाच्या बाजूने इस्रायली सैन्याने ताबा मिळवला आहे. यामुळे मानवतावादी मदत आणि संभाव्य सुरक्षित परिसराकडे जाण्याचा नागरिकांचा एक प्रमुख मार्ग रोखला गेला आहे.

इस्रायली 401 व्या ब्रिगेडने मंगळवारी पहाटेच रफाह सीमा चौकी परिसरावर धडक मारली. इस्रायली पायदळ आणि हवाई हल्ल्यांनी रफाहमधील हमासच्या संशयित स्थानांना लक्ष्य केले. या क्रॉसिंगचा वापर हमास दहशतवादी हेतूंसाठी करत असल्याचा सैन्याचा दावा आहे. पूर्व रफाहमध्ये हमासच्या अनेक लक्ष्यांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे 20 दहशतवादी मारले गेले आहेत, असे सैन्याने म्हटले आहे.

युद्धविराम प्रस्ताव इस्रायलने फेटाळला

युद्धविराम प्रस्ताव सोमवारी रात्री हमासने स्वीकारल्यामुळे राफातील पॅलेस्टीनींनी आता राफावर हल्ला होणार नाही या भावनेने आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र हा प्रस्ताव त्यांच्या मुख्य मागण्या पूर्ण करत नसल्याचे सांगत इस्रायलने फेटाळला. तरीही पैरोला या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवू, असे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

रणगाडय़ांचा थरार आणि स्थलांतरासाठी धावपळ

मंगळवारी पहाटेपासून शहरातून इस्रायली सैन्याच्या रणगाडय़ांचा थरार ऐकू येऊ लागला. इस्रायलने आक्रमण थांबवलेले नाही हे लक्षात आल्यावर युद्धविरामाच्या अपेक्षेतील राफावासीयांचा कालचा आनंद मावळला असून पुटुंबांची स्थलांतरासाठी धावपळ अधिक वेगवान झाली आहे.

नेतान्याहू यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने

पंतप्रधान नेतान्याहू यांचे जेरुसलेम येथील निवासस्थान गाझा मार्गावर आहे. येथे निदर्शकांनी युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी रात्री मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. ‘राफा आणि देरोत येथील लहानग्या मुलींना जगायचे आहे, युद्ध थांबवा’ असे फलक या निदर्शकांच्या हातात होते.