नरेंद्र मोदींचेच पाकिस्तानशी संबंध; नाना पटोले यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या तिसऱ्या टप्प्यातही इंडिया आघाडीचाच दबदबा दिसत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. मात्र, प्रत्यक्षात नरेंद्र मोदींचेच पाकिस्तानशी संबंध असल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस ही पाकिस्तानची बी टीम असल्याचं वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देत नाना पाटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढण्यावरून नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, हे दिसून येते असेही पटोले म्हणाले. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचा टोलाही पटोले यांनी मोदींना लगावला.

राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असेही पटोले म्हणाले. गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने विकास केला. तर भाजपने 10 वर्षात फक्त देश विकण्याचे काम केले, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडी 100 टक्के जागा पुढे आहे. आता तिसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र दिसेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.