वेब न्यूज – हिऱ्यांची उत्पत्ती

>> स्पायडरमॅन

जगात हिरे अनेक आहेत, पण कोहिनूर आणि होप डायमंडची बरोबरी करू शकेल असा एकही हिरा नाही. या हिऱयांची किंमत करणेदेखील अशक्य आहे. कोहिनूर हिरा हा ब्रिटिश क्राऊन ज्वेल्सची शोभा मानला जातो. कोहिनूर तर शापित हिरा आहे असे मानले जाते. तो ज्या राजाकडे गेला तो राजा मरण पावला असे म्हणतात. होप डायमंडदेखील खाणीतून चोरून आणल्याचे सांगतात. खाणीत सापडलेला हा हिरा एका मजुराने आपल्या पायाच्या जखमेत लपवून आणला.

सध्या होप डायमंड वॉशिंग्टनमधील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये ठेवण्यात आला आहे. 105.60 पॅरेटचा कोहिनूर आणि 45.52 पॅरेटचा होप डायमंड हे दोन्ही हिरे 1600 ते 1800 सालाच्या दरम्यान द. हिंदुस्थानात सापडल्याचा आणि नंतर ते ब्रिटन व इतर देशांत नेण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. या हिऱयांची उत्पत्ती कशी झाली आणि ते कुठे सापडले यासंदर्भातले गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ‘जर्नल ऑफ अर्थ सिस्टम सायन्स’मध्ये यासंदर्भात शोध निबंध प्रकाशित झाला आहे. त्यात कोहिनूरसह जगातील सर्वात प्रसिद्ध हिरे आंध्र प्रदेशातील वज्रकरूर किंबरलाइट फील्डपासून 300 किलोमीटर अंतरावर सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. असे हिरे नदीच्या गाळात केलेल्या खड्डय़ात मिळून येतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाला की, ते बाहेर येतात. अशा परिसराला किंबरलाइट फील्ड म्हणून ओळखले जाते. वज्रकरूरमधील जमीन ही या अशा प्रकारच्या हिऱयांना मजबूत आधार देणारी असल्याचे मानले जाते. याकोव्ह वेस जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात हिऱयांचा अभ्यास करतात. त्यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.