समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय

समाधान नानासाहेब पाटील या शिवसैनिकाची मतदान केंद्राच्या आवारात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, हा राजकीय खूनच असल्याची संतप्त प्रतिक्रिया धाराशिवमध्ये उमटली आहे. खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांनी मात्र हे प्रकरण किरकोळ हाणामारीचे असल्याचे भासवून दडपण्याचा आटापिटा चालवला आहे. घटनेला 24 तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल करण्यापलिकडे पोलिसांनी काहीही केले नाही. दरम्यान, शोकसंतप्त वातावरणात बुधवारी समाधान पाटील याच्यावर पाटसावंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धाराशिव मतदारसंघात मंगळवारी तिसर्‍या टप्प्यात मतदान घेण्यात आले. गद्दार तानाजी सावंतांची अवस्था या निवडणुकीत अतिशय केविलवाणी झाली. सुरूवातीला ज्यांना विरोध केला, निवडणुकीत त्यांच्याच समोर हुजरेगिरी करण्याची वेळ आली. त्याबरोबरच मतदारांनीही सावंतांना झिडकारले. अनेक गावातून मराठा आंदोलकांनी त्यांना हाकलून दिले. महायुतीचा पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ चवताळला. याच वैफल्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांचा कार्यकर्ता गौरव उर्फ लाल्या अप्पाराव नाईकनवरे याने समाधान नानासाहेब पाटील या शिवसैनिकाला जिल्हा परिषद शाळेत असलेल्या मतदान केंद्राच्या परिसरातच चाकूने भोसकले. समाधानचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क मृतदेहच उपचारासाठी म्हणून बार्शीला पाठवला. एवढेच नाहीतर हे प्रकरण मतदान केंद्राच्या आवारात घडले नसून प्रेमप्रकरणातून भोसकण्यात आल्याचे खूद्द पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

मूळ घटना अशी आहे

जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. मतदान सुरू असतानाच तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे हा तेथे आला. मतदान केंद्रावरील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भारत पाटील याच्याशी त्याने वाद घातला. समाधान पाटील आणि शंकर शिंदे या दोघांनी मध्यस्थी केल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला. काही वेळाने समाधान आणि शंकर हे मतदान केंद्राच्या आवारातून बाहेर पडत असतानाच गौरव नाईकनवरे, आप्पाराव नाईकनवरे, राजकुमार नाईकनवरे, दत्तात्रय नाईकनवरे हे तिथे आले. तिघांनी समाधानला पकडले आणि गौरवने त्याच्या पोटात चाकूने वार केला. शंकर त्याला वाचवण्यासाठी धावला असता त्याच्यावरही वार करण्यात आले.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

चाकूचे वार खोलवर झाल्याने जागेवरच समाधानचा तडफडून मृत्यू झाला. परंतु मतदार संघात या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी पोलिसांनी त्याला बार्शीला हलवले. आज त्याचे पार्थिव पाटसावंगीत आणण्यात आले. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली. गावकर्‍यांच्या भूमिकेमुळे पोलीस हवालदिल झाले. अखेर कडक कारवाईची हमी दिल्यानंतर शोकाकूल वातावरणात समाधानवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार राहुल मोटे, उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, संजय बोराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत पाटोळे, विहंग कदम आदींची उपस्थिती होती.

पोलिसांकडून ‘खेकड्याची’ चाकरी

भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी वैयक्तिक कारणातून ही घटना घडली असून, राजकारणाशी त्याचा काही संबंध नसल्याचे पत्रक काढून हल्लेखोराला पाठीशी घातले. एवढेच काय हल्ला केल्यानंतर पोलिसांच्या डोळ्यादेखत गौरव कुटुंबासह फरार झाला. तानाजी सावंतांच्या दबावामुळे पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यासही टाळाटाळ केली. अखेर गावकर्‍यांच्या ताठर भूमिकेपुढे नमते घेत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा घडून २४ तास उलटून गेले तरी अजून एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. हे चारही जण राजकीय आश्रयाला गेल्याची चर्चा आहे.

मतदान केंद्राच्या आवारात चाकू कसा?

मतदान केंद्र अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे जेथे मतदान केंद्र उभारण्यात येते त्याच्या १०० मीटर परिसरात कोणतेही शस्त्र आणण्यास सक्त मनाई असते. असे असतानाही गौरव हा थेट आवारात चाकू घेऊन आला. मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी हा सगळा प्रकार घडत होता तेव्हा कुठे होते? त्यांच्यावर कारवाई का नाही? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.