लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात अनाउन्समेंट; मराठी रंगभूमीवर ‘एआय’चा प्रयोग

नुकतेच रंगभूमीवर दाखल झालेले ‘आज्जीबाई जोरात’ हे महाबालनाटय़ सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. या नाटकात एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधत आहे ती म्हणजे नाटकाची अनाउन्समेंट. चक्क दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजात नाटकाची अनाउन्समेंट होत असल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतोय. याबाबत नाटकाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी नुकतीच एक पोस्ट करत म्हटलेय, ‘रंगभूमीवर पहिल्यांदाच होत असलेल्या एआय अनाउन्समेंटला प्रत्येक प्रयोगाला टाळ्या मिळतायत. या दीड मिनिटाच्या अनाउन्समेंटसाठी गेले तीन महिने इंजिनीयर्स आणि टेक्निशियन काम करत होते. सरांच्या कुटुंबीयांच्या आपुलकी आणि प्रेमामुळे हे शक्य झाले’. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकानिमित्ताने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डे रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

मुलाच्या नाटकाला वडिलांचा आशीर्वाद

एआयच्या तंत्रज्ञानाने जगाला चुणूक दाखवली आहे. रंगभूमीच्या प्रेक्षकांनीही त्याचा अनुभव घ्यावा म्हणून हा अनोखा प्रयोग आम्ही केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ‘आज्जीबाई जोरात’ नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. या नाटकाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज लाभल्याने ते मुलाच्या नाटकाला आशीर्वाद देत आहे असे वाटते, असे क्षितिज पटवर्धन म्हणाले.