नांदेड – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना अटक

अष्टविनायक नगरातील सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र रामचंद्र जोशी यांच्यावर गोळीबार करुन चाळीस हजार रुपये रोख व मोबाईल लुटून नेल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. यातील आरोपींना पोलिसांनी पकडले असून, पळून जाणार्‍या एका आरोपीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने तो जखमी झाला आहे. यातील तिन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. काल सायंकाळी अष्टविनायक नगर परिसरात स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र रामचंद्र जोशी हे बँकेतून पैसे काढून घरी परत जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांची बॅग लुटून त्यातील चाळीस हजार रुपये व त्यांच्या हातातील मोबाईल पळवून नेला होता. यावेळी जोशी यांनी या चोरट्यांचा सामना करत एकाला खाले पाडले. मात्र चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती कळताच विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहंचले. पाहणी केल्यानंतर व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी दोन वेगवेगळी पथके निर्माण केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे व त्यांचे सहकारी असदवन भागात गेले. फिर्यादी जोशी यांची रेकी करणार्‍या हरदिपसिंघ धिल्लो याला पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. धिल्लोने मुख्य दोन आरोपींचा पत्ता सांगितला व धिल्लोला घेवून पोलीस एका धाब्यावर पोहंचले. तेंव्हा दोन आरोपीपैकी एकाने पोलिसांच्या पथकावर गोळी झाडली. त्याच्या प्रतिउत्तरात पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

आरोपी सरप्रितसिंघ उर्फ साजन दलबिरसिंघ सहोता (24) रा.पंजाब यास गोळी लागल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी रोहित सतपाल कोडा रा.बरीवाला जि.मुक्तसर साहिब (पंजाब) यास अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टीव्हा गाडी तसेच एक कार, गुन्ह्यात वापरलेली पिस्टल व चाकू, नगदी रोख रक्कम चाळीस हजार असा 4 लाख 15 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पैकी सरप्रितसिंघ सहोता व रोहित सतपाल कोडा यास भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार केल्याप्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेकी करणारा व याबाबत टिप देणारा हरदिपसिंघ धिल्लो हा हॉटेल व्यावसायिक असून, तो दशमेशनगर भागातील रहिवाशी आहे. दुपारी घडलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तातडीने हालचाली करुन केवळ बारा तासात आरोपीला अटक केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.