शोरमा खाल्ल्याने 15 मुलांना विषबाधा; एकाचा मृत्यू

मानखुर्दमध्ये चिकन शोरमा खाल्ल्यामुळे सुमारे 15 मुलांना विषबाधा झाली असून एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री आज घडली. या घटनेत प्रथमेश भोकसे (19) या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव पूर्व संतोष नगर परिसरात 26 एप्रिलला रस्त्यावरील चिकन शोरमा खाल्ल्याने 15 जणांना विषबाधा झाली होती. मात्र सोमवार रात्रीच्या घटनेत एका मुलाचा नाहक बळी गेला आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमधील हनुमान चाळीजवळ एका फेरीवाल्याकडील चिकन शोरमा सोमवारी काही जणांनी खाल्ले होते. अर्ध्या तासानंतर या सर्वांना पोटात मळमळणे, उलटय़ा आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. या मुलांना पालिकेच्या शताब्दी, शीव, केईएम रुग्णालयात आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर यातील काहींची प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले, तर काहींना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र एका मुलाचा यात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्यालगत पदार्थ बनवून विकणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. हे पदार्थ बनवताना कोणत्याही प्रकारची स्वच्छता बाळगली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच अस्वच्छतेमुळेच हे पदार्थ खाल्ल्यानंतर विषबाधा होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पालिकेच्या एम पश्चिम मानखुर्द विभाग कार्यालयाकडून बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.