प्ले ऑफच्या शर्यतीतील रस्सीखेच; हैदराबाद-लखनऊत आज अस्तित्वाची लढाई

सनरायझर्स हैदराबाद संघापुढे उद्या बुधवारी घरच्या मैदानावर लखनऊ सुपरजायंट्सचे आव्हान असेल. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीचा उत्तरार्ध सुरू असल्याने प्ले ऑफची शर्यतीतील सस्पेन्स आता वाढायला लागलाय. हैदराबाद आणि लखनऊ या दोन्ही संघांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी एक-एक विजय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये होणारी लढत ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई असेल.

हैदराबाद व लखनऊ  या दोन्ही संघांनी 11 पैकी 6 लढती जिंकल्या असून, उभय संघांच्या खात्यात 12-12 गुण जमा आहेत. लखनऊ सरस नेट रनरेटमुळे चौथ्या, तर हैदराबाद पाचव्या स्थानी आहे. कोलकाता (16 गुण), राजस्थान (16 गुण) व चेन्नई (12 गुण) हे संघ गुणतक्त्यात अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. हैदराबाद व लखनऊ यांच्यातील लढतीत जो संघ जिंकेल तो संघ प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे असेल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या संघात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाहीये, मात्र तरीही या संघाला मागील चारपैकी तीन लढतींत पराभव पत्करावा लागलाय. ट्रव्हिस हेड वगळता इतर फलंदाजांनी नंतर निराशा केली. युवा फलंदाज अभिषेक शर्माची मागील चार सामन्यांत 30 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. मधल्या फळीत हेन्री क्लासन सातत्याने अपयशी ठयरतोय. नितीश रेड्डीलाही कामगिरीत सातत्य दाखविता आलेले नाहीये. टी. नटराजन व अनुभवी भुवनेश्वर कुमार यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे हैदराबादला विजयाच्या रुळावर आणण्यासाठी फलंदाजांना पुन्हा एकदा आपले योगदान द्यावे लागणार आहे.

दुसरीकडे मागील लढतीत लखनऊचा कोलकात्याने धुव्वा उडविला होता. संपूर्ण स्पर्धेत प्रथमच दोनशे धावा दिल्यानंतर हैदराबादचा संघ 137 धावांवरच गारद झाला होता. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी कर्णधार लोकेश राहुलसह मार्कस स्टोइनिस व निकोलस पूरन यांना पुन्हा आपल्या लौकिकास साजेसा खेळ करावा लागणार आहे. आयुष बदोनी यालाही यंदाच्या आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेला वेगवान गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानही जायबंदी झाल्याने लखनऊ संघाची घडी थोडी विस्कटलीय. आता या संघाची मदार नवीनुल हक, यश ठाकूर, स्टॉइनिस आणि कृणाल पंडय़ा व रवी बिष्णोई या फिरकीच्या जोडगोळीवर असेल.