रोहितला झालंय तरी काय ? सलग पाच सामन्यांत केवळ 33 धावा; हिटमॅनला थोडासा ब्रेक घेण्याचा सल्ला

तब्बल तीन आठवडय़ांपूर्वी रोहित शर्माच्या बॅटीतून शतकी खेळी निघाली होती. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याच्या 105 धावांच्या एकाकी झुंजीनंतरही मुंबई हरली. मात्र त्यानंतर त्याचा धावांचा सुरू झालेला दुष्काळ संपण्याचे नावच घेत नाहीय. सलग पाच सामन्यांत हिटमॅनने  6, 8, 4, 11, 4 अशा निराशाजनक खेळी केल्यामुळे सर्वांना एकच प्रश्न पडलाय, रोहितला नक्की झालंय तरी काय ? आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपविल्यानंतर त्याच्या बॅटने अक्षरशः मान टाकलीय. त्याचा खेळ पाहून हिंदुस्थानी संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याने आता थोडासा ब्रेक घ्यावा, असा सल्लाही दिला जाऊ लागला आहे.

रोहितच्या अपयशी कामगिरीचा सर्वात मोठा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. चेन्नईविरुद्ध 105 धावांची झुंजार खेळी पाहिल्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेट़फ्रेमींची छाती अभिमानाने फुगली होती. आगामी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाच्या जोरदार कामगिरीबाबत सारे निश्चिंत झाले होते. गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने केलेल्या बेधडक खेळींमुळेच हिंदुस्थान अंतिम फेरीत पोहोचला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे अमेरिका-विंडीजमध्येही रोहितची बॅट धमाल करणार यावर सर्वांना विश्वास बसला होता. पण त्यानंतर रोहितच्या फलंदाजीची सुरू असलेली मैदानात हजेरी लावून डगआऊटमध्ये परतण्याची वृत्ती पाहून क्रिकेटप्रेमी भेदरले आहेत. केवळ रोहितची बॅटच मुंबईसाठी पुरेशी होती, पण तोच हजेरीसम्राट झाल्यामुळे मुंबईला प्ले ऑफ तर दूर, सर्वप्रथम आयपीएलमधून तोंड लपवून बाहेर पडण्याची वेळ आली. 11 सामन्यांत 8 पराभवांनी मुंबई इंडियन्सची लाज काढली आहे. रोहितच्या अपयशामुळे मुंबई व्हेंटिलेटरवर गेला, पुढे कोमात गेला आणि मग कामातून गेला. जेव्हा मुंबईला विजयाच्या ऑक्सिजनची गरज होती तेव्हा रोहितसह भरवशाच्या फलंदाजांनीही माती खाल्ल्यामुळे मुंबईला दोनदा पराभवांचा चौकार खावा लागला आहे.

मुंबईच्या अपयशात कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या निराशाजनक खेळाचा जितका हात आहे, तितकाच रोहितचाही वाटा आहे. पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर मुंबईला प्ले ऑफची सुवर्णसंधी होती, पण राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता या संघाकडून मुंबईला हार पचवावी लागली आणि मुंबईचे सारे गणितच बदलले.

सलगच्या पराभवामुळे रोहित आणि त्याची बॅट दमल्यासारखी वाटू लागलीय. भले सामना टी-20 असो, पण रोहितचे अपयश आणि त्याचा खेळ कुणीही लपवू शकत नाही. त्याचे अपयश हिंदुस्थानी संघाला फार महागात पडू शकते. त्याचे ताजेतवाने राहणे संघासाठी फार महत्त्वाचे आहे. थकलेला-दमलेला रोहित सलामीला उतरून वारंवार त्याच चुका करतोय आणि मग चरफडत पॅव्हेलियनमध्ये परततोय, हे पाहून मनात धस्स होऊ लागलेय. त्याला बकरा बनवणे सोप्पं काम झाल्यासारखे बोलले जातेय. मुंबईचे आव्हान संपले आहे. रोहितनेही फॉर्म मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा स्वतःला फ्रेश करण्यासाठी ब्रेक घ्यायला हवा, असा आवाजही येऊ लागलाय. त्याच्या अपयशामुळे जी मुंबई इंडियन्सची अवस्था झाली आहे, ती हिंदुस्थानचीही होऊ नये, असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर रोहितने मनशांतीसाठी ब्रेक घ्यावा, असेच क्रिकेटप्रेमींना वाटू लागले आहे. पण रोहित क्रिकेटपासून ब्रेक घेतो की नाही, ते पुढच्या सामन्यापूर्वी कळेलच.

थकलेल्या रोहितने ब्रेक घ्यावा

वैयक्तिक आणि सांघिक अपयशामुळे रोहित शर्मा दमलाय. त्याला आता वर्ल्ड कपसाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी थोडासा ब्रेक घ्यायला हवा, असा सल्ला खुद्द माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने दिलाय. रोहित आपल्या कामगिरीचे स्वतः आकलन करू शकतो. जशी रोहितने सुरुवात केली होती, नंतरचा खेळ पाहून तो निराश झालाय. माझ्या मते तो थकलाय. अशा स्थितीत त्याने थोडासा ब्रेक घ्यायला हवाय. पण तो मुंबईचाही आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्याला ब्रेक मिळणे कठीण आहे. रोहित प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याला जास्त दिवस फॉर्मची वाट पाहावी लागणार नसल्याचेही क्लार्क म्हणाला.