… म्हणून धोनीने नवव्या क्रमांकावर  फलंदाजी केली

चेन्नईचा संकटमोचक महेंद्रसिंग धोनी पंजाबविरुद्धच्या लढतीत आपला संघ संकटात असताना थेट नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यामुळे माहीवर चौफेर टीका सुरू झाली. मात्र, धोनीच्या मांडीचे स्नायू फाटले असून, यष्टिरक्षणासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला धुडकावून धोनी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने चेन्नई संघातील सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली.

धरमशाला येथे पंजाबविरुद्धच्या सामन्यात 16 व्या षटकाच्या अखेरीस चेन्नईची 6 बाद 122 अशी अवस्था झाली होती. सहावी विकेट गमावली तेव्हा धोनी फलंदाजीला येईल, अशी सर्वांची अपेक्षा होती, पण धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच माही इतक्या खालच्या स्थानावर फलंदाजीला आला होता. मात्र, चेन्नईमधील एका सूत्राने सांगितले की, माजी कर्णधार संपूर्ण आयपीएलमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीसह खेळत आहे आणि त्यामुळे फार वेळ धावणे त्याच्या दुखापतीसाठी अधिक घातक ठरू शकते. आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धोनीच्या पायाचे स्नायू फाटले. धोनी यामुळे आयपीएल 2024 मधून ब्रेकही घेणार होता, पण जेव्हा संघाचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल खेळण्यासाठी हिंदुस्थानात येऊ शकत नसल्याने माहीला स्वतःला विश्रांती देण्याचा विचार सोडावा लागला. धोनीला वेदना असूनही औषधे घेऊन खेळावे लागत आहे आणि कमी धावण्याचा प्रयत्न करावा लागतो, अशी परिस्थिती आहे.