स्कॉटलंड, युगांडाचेही संघ जाहीर; स्कॉटलंडचा सहाव्यांदा सहभाग, युगांडाचे पदार्पण

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी स्कॉटलंड आणि युगांडानेही आपले संघ जाहीर केले. स्कॉटलंडचे नेतृत्व रिची बेरिंग्टनकडे तर युगांडाचे कर्णधारपद ब्रायन मसाबाकडे सोपविण्यात आले आहे. स्कॉटलंडचा संघ सहाव्यांदा टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे तर युगांडा प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

आफ्रिकन खंडातून झालेल्या पात्रता फेरीत युगांडाने झिम्बाब्वेला धक्का देत ऐतिहासिक विजय नोंदविला होता. त्यांचा या धक्कादायक कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता हा संघ ‘क’ गटातून अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी आणि यजमान वेस्ट इंडीजशी भिडेल. तसेच इंग्लिश काQटीमध्ये खेळत असलेल्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश स्कॉटलंडच्या 15 सदस्यीय संघात करण्यात आला आहे. आतापर्यंत स्कॉटलंड 2007, 2009, 2016, 2021 आणि 2022 हे पाच वर्ल्ड कप खेळला आहे. 2007 साली पदार्पण करणारा स्कॉटलंड सलग तिसऱयांदा या वेगवान स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

यंदा वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ खेळत असून आतापर्यंत 13 संघाने आपले 15 सदस्यीय संघ जाहीर केले आहेत. आता फक्त पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलॅण्डस आणि पापुआ न्यू गिनी या सात संघांनी आपले संघ जाहीर केलेले नाहीत.

स्कॉटलंडचा संघ

रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (यष्टिरक्षक), मायकल जोन्स, जॉर्ज मन्सी, मायकल लिस्क, ब्रॅण्डन मॅकलन, ख्रिस ग्रिव्हज, जॅक जार्विस, साफयान शरीफ, ख्रिस सोल, मार्क वॅट, ब्रॅड व्हिल, ओली कार्टर, ब्रॅडली, करी, चार्ली टीअर.

युगांडाचा संघ

ब्रायन मसाबा (कर्णधार), रियाजत अली शाह (उपकर्णधार), फ्रेड अचिलम (यष्टिरक्षक), दिनेश नकरानी, अल्पेश रामजानी, केनिथ वायसवा, बिलाल हसन, कॉसमॉस क्येवुटा, रॉजर मुकासा, फ्रँक एनसुबुगा, रॉबीन्सन ओबुया, रोनक पटेल, हेन्री एसेनयोंदो, सायम एसेसाजी.