बापरे… कोहलीला डच्चू! संजय मांजरेकरने निवडला टी-20 वर्ल्ड कपचा सर्वात वादग्रस्त संघ

नेहमीच आपल्या हटके गोष्टींमुळे वादग्रस्त ठरत असलेला माजी कसोटीपटू आणि विद्यमान समालोचक संजय मांजरेकरने आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचा 15 सदस्यीय संघाची निवड केली असून हा संघ सर्वात वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक 430 धावा करणाऱया विराट कोहलीला संभाव्य संघातून वगळण्याचे धाडस मांजरेकरने दाखवले असून त्याने तीन नवोदित गोलंदाजांची निवड केल्यामुळेही सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 येत्या एक-दोन दिवसांत हिंदुस्थानचा संघ जाहीर होईल आणि त्यादरम्यान काही बॉम्बस्पह्टही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारांची संख्या वाढल्यामुळे निवड समितीला काही कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत. त्यामुळे न्याय-अन्यायाची चर्चाही रंगेल, पण त्याआधी संजय मांजरेकरच्या संघानेही सर्वांना धक्का दिला आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी मांजरेकरआधी वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद पैफ, अंबाती रायुडू यांनीही आपापले संघ जाहीर केले होते, पण कुणीही विराट कोहलीला वगळले नव्हते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा होत असल्या तरी त्याचा खेळ टी-20 च्या वेगवान खेळाला साजेसा नसल्यामुळे त्याने आपल्या संघातून त्याला वगळले आहे. एवढेच नव्हे तर सध्या गुजरातसाठी धावांचा पाऊस पाडणारा शुबमन गिलसुद्धा सलामीवीर म्हणून मांजरेकरच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र ऋषभ पंत असतानाही त्याने संजू सॅमसनची निवड केली आहे आणि राहुललाही संघात कायम ठेवले आहे.

 

मांजरेकरचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, के. एल. राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षित राणा, मयंक यादव, कृणाल पंडय़ा.

हार्दिक नव्हे कृणाल पंडय़ा

विराट, शुबमननंतर हार्दिक पंडय़ालाही त्याने काढलेले आहे. हार्दिकची कामगिरी अष्टपैलू खेळाडूला साजेशी होत नाहीय. त्याच्या गोलंदाजीतही धार नसल्यामुळे संघात नसल्याचे कळले आहे. मात्र अष्टपैलू म्हणून कृणाल पंडय़ाला स्थान मिळाल्याने साऱयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यंदाचा वर्ल्ड कप पॅरेबियन बेटांवर होत असल्यामुळे मांजरेकरने आपल्या संभाव्य संघात हर्षित राणा, मयंक यादव, आवेश खान या तीन नवोदित वेगवान गोलंदाजांची वर्णी लावली आहे. तसेच मोहम्मद सिराजलाही कायम ठेवले आहे. मांजरेकरचा संघ सर्वात वादग्रस्त असला तरी निवड समितीच्या संघाशी किती बरोबरी साधतो, हे पाहणे नक्कीच मजेशीर ठरणार आहे.