कोळीवाडय़ाचा त्रास होत असेल तर गुजरातला जाऊन निवडणूक लढवा! संजय राऊत यांनी पियूष गोयल यांना सुनावले

कोळीवाडय़ांमध्ये भाजप प्रचार रॅलीदरम्यान फिरताना भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार हे नाकाला रुमाल लावून फिरतात. इतकी त्यांना त्यांची घाण वाटते. महाराष्ट्रात जर तुमच्या नाकाचे केस जळत असतील तर तुम्ही गुजरातला जाऊन निवडणूक लढवा, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांना सुनावले.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पियूष गोयल यांच्यावर जोरदार टीका केली. मासेमारी करणे हा येथील कोळीवाडय़ांमध्ये राहणाऱया कोळी बांधवांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. हे कोळी बांधव येथील मूळ भूमिपुत्र आहेत आणि या भूमिपुत्रांची आणि त्यांच्या व्यवसायाची भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांना घाण वाटते. हे नाकाला रुमाल लावून फिरतात. मग हे त्या भूमिपुत्रांच्या समस्या कसे सोडवणार? असा सवाल करत भूमिपुत्रांचा अपमान करणाऱया गोयल यांना महाराष्ट्रात निवडणूक लढवायचा अधिकार नाही, अशा शब्दांत सुनावले.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित होते. यावेळी त्यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून 400 पारच्या घोषणा देत देशभर फिरतात, पण मुळात 200 पार होणेसुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालेल, अशी आशा भाजपवाले बाळगून होते, पण ती पूर्णपणे पह्ल ठरलेली आहे असे ते म्हणाले.

यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर, आमदार विलास पोतनीस, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आमदार अमीन पटेल, माजी आमदार अशोक जाधव, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत आदी उपस्थित होते.

भाजपने उत्तर मुंबईमध्ये उभे केलेले पेडर रोडचे पार्सल परत पेडर रोडला पाठवून येथील भूमिपुत्र भूषण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा.
n संजय राऊत, शिवसेना नेते खासदार

पंतप्रधान मोदी हे शरद पवार आणि शिवसेनेबद्दल कितीही बोलले तरी फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या सोबत आहे. शिवसैनिक आणि इथली शिवसेना तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
n रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांची शिवसेना शाखा प्रभाग क्र. 206 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी महिला पुरुष, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संलग्न संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिकांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

जम्मू-कश्मीरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते मुबईत तीन दिवसांपासून इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सहकार्य करत आहेत. भाजपाविरोधात मुंबईतही प्रचंड संताप दिसून येत असल्याचे जम्मू-कश्मीरमधील शिवसेना कार्यकर्ते मनीष साहनी यांनी सांगितले. या कार्यकर्त्यांनी आज दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारात सहभाग घेतला आणि देसाई यांना शुभेच्छा देतानाच श्री माता वैष्णोदेवीचा प्रसाद आणि चुनरी भेट दिली.