महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा; देशात अनेक जागांवर जातींमध्ये लढाई

या वेळच्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे निवडणुकीचा डाव पलटू शकणार आहेत. कारण देशभरात अनेक जागांवर उमेदवारांमध्ये नाही तर जातींमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र उभे राहिले आहे. खासकरून या वेळी बीडमधील निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनू शकतो.

बीडमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते आणि माजी दिवंगत मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपीचे उमेदवार बजरंग सोनवणे मैदानात आहेत. त्यामुळे मुंडे यांची थेट लढत सोनवणे यांच्याशी आहे. एक प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा यांना भाजपाने काही कालावधीसाठी दूर केले होते. परंतु आता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात तिकीट दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मराठा चेहरा बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, 2019मध्ये भाजपा उमेदवाराचा तब्बल 1.68 लाख मतांनी पराभव झाला होता. या वेळी येथे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई लढली जाणार आहे.

पंकजा मुंडेंना हवीय चर्चा
बऱयाच कालावधीपासून मराठा समुदायातील एक वर्ग महायुतीतून बाजूला केला गेला. मात्र आता मराठा आरक्षणाचा मुद्दाही केंद्रस्थानी असणार आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंडे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे; परंतु माझ्याच मतदारसंघात जातीच्या आधारावर राजकारण होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात यंदाची लढाई चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी आणि धाराशीव येथे आरक्षणाचा मुद्दा तापल्याचे चित्र आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांची लोकप्रियता घटली
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचे चित्र आहे. या वेळी येथील जनतेला नवा चेहरा हवा आहे. बिहारच्या भागलपूरमध्ये जवळपास 20 लाख मतदार आहेत. त्यातील साडेचार लाख मुस्लीम आणि 3 लाख यादव आहेत. जवळपास 2 लाख मतदार दलित आणि कुर्मी तर 5 लाख मतदार उच्चवर्णीय जातीचे आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा मोदींनाच पुढे करून निवडणूक लढण्याचा प्रयत्न आहे, असे बोलले जात आहे.

राजस्थानात भाजपला फटका
राजस्थानात दुसऱ्या टप्प्यात बाडमेर, जैसलमेर, बांसवाडा, जालौर, कोटा, जोधपूर आणि टोंक येथे मतदान पार पडले. मोदी यांनी बांसवाडा येथे काँग्रेस लोकांच्या संपत्तीचे वाटप मुस्लिमांमध्ये करेल, असे विधान केले होते. मोदींच्या या विधानाचा फटका भाजपला राजस्थानात बसू शकतो. दरम्यान, बाडमेर येथे केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांची टक्कर अपक्ष उमेदवार रवींद्र भाटी आणि काँग्रेसचे उमेदवार राम बेनीवाल यांच्याशी आहे.