वादग्रस्त वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

भारतीय नागरिकांच्या चेहरेपट्टीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी बुधवारी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पित्रोदा यांनी स्वेच्छेने दिलेला हा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वीकारला असल्याचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागांतील भारतीय कसे दिसतात याचे पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेले वर्णन वादग्रस्त ठरले होते. काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्याला ‘सर्वात दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह’ म्हणत हे वक्तव्य मान्य नसल्याचे जाहीर केले होते.

सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय स्वतःच्या मर्जीने घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा निर्णय मान्य केला आहे, असे रमेश यांनी ‘एक्स’वरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.