आभाळमाया – ‘थिया’चा प्रताप?

>> वैश्विक, [email protected]

अनेक आनंददायी ‘सण’ देणारा किंवा उत्साह निर्माण करणारा चंद्र पुनवेचा, खग्रास सूर्यग्रहण दाखवणारा आवसेचा. त्याच्या अनेक कला लोभस वाटणाऱया दुर्बिणीतून तर अधिक छान दिसणाऱया. त्याचं नातं कुणाशी भावाचं तर कुणाशी मामाचं. एवंगुणविशिष्ट चंद्र अवकाशात नसताच तर काय झालं असतं? तर कदाचित आपणही हे लिहायला नि वाचायला पृथ्वीवर नसतो. कारण पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या उत्क्रांतीमध्ये चंद्राचा वाटा मोठा आहे. सूर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणांच्या एकत्रित प्रभावाने पृथ्वीवरच्या पाण्याला भरती-ओहोटी येते हे खरंच, पण त्यात जास्त सहभाग चंद्राचा.

पृथ्वीपासून एका विशिष्ट अंतरावर फिरणारा, त्यातही पृथ्वीच्या गतीशी त्याची स्वतःभोवतीची गती समान असणारा आणि त्यामुळे आपल्याला केवळ त्याच्या चेहऱयाची एकच बाजू दाखवणारा चंद्र कसा आणि कधी जन्माला आला? त्याचा जन्मकाळही पृथ्वीनंतर लगेच म्हणजे सुमारे चार अब्ज वर्षे मागे जातो. मुळात आपला सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी अवतरला आणि त्या ‘तेजोनिधी वायुगोला’तून लगेच सारी ग्रहमाला आकाराला आली. स्वतःच्या ‘बालवया’त सूर्य उत्सर्जित करत असलेली आग आणि बरंच वस्तुमान अंतराळात दूरवर जाऊन त्याच्याच (सूर्याच्या) गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने त्याभोवती फिरत होतं.

बुधापासून ते किपर पट्टय़ापर्यंत सारे लहान-मोठे ग्रह आणि अशनींचे (महापाषाणांचे) पट्टे निर्माण झाले ते सूर्यातून निघालेल्या केवळ दोन टक्के वस्तुमानातून. बाकी अठ्ठय़ाण्णव टक्के वस्तुमान एकटय़ा सूर्यातच सामावलंय. त्यामुळे सर्व ग्रह जरी योगायोगाने पिंवा त्यांच्या कक्षेत फिरता फिरता एका बाजूला आले तरी सूर्याला काहीच फरक पडत नाही. त्यातलीच एक जोडगोळी म्हणजे पृथ्वी आणि चंद्र.

आपला चंद्र पृथ्वीपासून आणखी 1700 किलोमीटर दूर असता तर या दोन्ही गोलकांमधला गुरुत्वीय बिंदू (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी) अंतराळात कुठेतरी येऊन ते द्वैती ग्रह झाले असते. प्लुटो आणि शेरॉन तसंच असल्याने प्लुटोचं ‘ग्रहपद’ 2006 मध्ये गेलं, परंतु आपला चंद्र पृथ्वीभोवती नेमाने फिरतो. त्याच्या जन्मकथा मात्र वेगवेगळय़ा काळात निरनिराळय़ा सांगितल्या गेल्या. आपल्याकडच्या प्राचीन कल्पनेत चंद्राचा जन्म क्षीरसागरातून झाला आणि समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी ते एक ‘रत्न’ मानलं गेलं. आधुनिक विज्ञानातील माहितीनुसार, पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारा चंद्र उपभू ??? पिंवा पृथ्वीजवळच्या स्थानावर असतो तेव्हा त्याचं आपलं अंतर तीन लाख 62 हजार किलोमीटर आणि दूरच्या कक्षेत पिंवा ‘अप-भू’ ठिकाणी असतो तेव्हा चार लाख पाच हजार किलोमीटर अंतरावर जातो. तो आपल्यापासून खूपच जवळ असल्याने चांद्रस्वारी फारशी अवघड नाही हे बारा वेळा सिद्ध झालंय आणि अमेरिकेतून तेरावा (जपानी) चांद्रवीर पुन्हा चंद्रावर जायच्या तयारीत आहे.

संभाव्य स्पेस ट्रव्हलसाठी पहिलं ‘स्टेशन’ असलेला चंद्र नसता तर एकदम मंगळावर जावं लागलं असतं. 1969 मध्ये चंद्रावर माणूस जाऊन आता 55 वर्षे होत आली तरी मंगळावर माणूस पाठवण्याचा उपक्रम प्रत्यक्षात यायचा आहे.

आतापर्यंतच्या अनेक चांद्रयानांनी (देशी-विदेशी) चंद्राची भरपूर माहिती आणि तिथली दगडमातीही पृथ्वीवर आणली आहे. सोव्हिएत युनियनचं (आताचा रशिया) ‘ल्युना-2’ हे धडकयान (इम्पॅक्टर) चांद्रपृष्ठावर 13 सप्टेंबर 1959 रोजी धडकलं आणि चंद्राला माणसाचा पिंवा मानवनिर्मित वस्तूचा पहिला स्पर्श झाला.

असा हा ‘शीतल’ (वाटणारा) चंद्र जन्माला आला तो मात्र पृथ्वी आणि मंगळासारख्या ‘थिया’ नावाच्या आता अस्तित्वात नसलेल्या एका ग्रहाच्या प्रचंड टकरीतून. त्यातून ‘थिया’ नष्ट झाला, पृथ्वी डळमळली, पण सावरली आणि दोन्ही ग्रहांमधल्या काही वस्तुमानाचा एक गोलक बनून तो पृथ्वीभोवती फिरू लागला. त्याचे नाव चंद्र. ‘थिया’ अर्थातच नष्ट झाल्याने त्यातील अवशेष अंतराळात विखुरले गेले. असाच एक चंद्राचा तुकडा (चंक) दूरवर भिरभिरत आहे. त्याविषयी आपण वाचलंय.

पृथ्वी आणि चंद्राचा गुरुत्वमध्य भूपृष्ठाखाली 1700 किलोमीटरवर असल्याने चंद्राला पृथ्वीभोवती फिरावं लागतं. ‘थिया’च्या प्रतापाने पिंवा उत्पाताने खरं तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीवर नकळत अनंत उपकार केलेत असं म्हणायला हवं. आपल्या अस्तित्वात त्या ‘थिया’ प्रतापाचा वाटा आहेच.

पृथ्वी-थिया यांच्या ‘संघर्षा’तून निर्माण झालेला चंद्र पृथ्वीवरच्या कुणाच्याही मालकीचा नाही. 1967 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार ‘स्पेस’वर कोणाही देशाची, व्यक्तीची, समूहाची मालकी नसेल. प्रयोगासाठी, साहसासाठी (पर्यटनासाठीसुद्धा) कोणीही भावी काळात चंद्रावर जाऊ शकेल, परंतु तो पृथ्वीवरच्या सर्वांचा पूर्वीपासून आहे तसाच लाडका ‘चांदोबा’ राहील. प्रेमिकांच्या ‘साक्षी’ला येईल आणि वैज्ञानिकांना संशोधनाची कवाडं खुली करून देईल. तेव्हा त्या अज्ञात ‘थिया’चं ऋणी असायला हवं. सोबत ‘थिया’चं कल्पनाचित्र नेटवरून.