सदावर्ते दांपत्याचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द, सहकार खात्याचा दणका

राज्याच्या सहकार विभागाने गुणरत्न सदावर्ते दांपत्याला दणका दिला आहे. सदावर्ते यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द केले असून यापुढे हे दांपत्य तज्ञ संचालक म्हणून एसटी बँकेवर काम करू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे नेते संदीप शिंदे यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.

एसटी को-ऑपरेटीव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम आता रद्द करावे लागणार आहेत. तसेच सदावर्ते दांपत्याचे संचालकपदही रद्द करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. एसटी महामंडळाच्या बाहेरील लोकांना संचालकपदावर ठेवण्याचा अधिकार सहकार विभागाने नामंजूर केला आहे. सदावर्ते यांच्या पॅनेलच्या संचालक मंडळाने यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटीव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप केले नव्हते. या अहवालावर नथुराम गोडसे यांचे पह्टो छापल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. नियमानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना चौदा दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक असते, मात्र अशी कोणतीही सचूना संचालक मंडळाकडून सर्व सभासदांना दिली नव्हती. केवळ सदावर्ते यांच्या मर्जीतील सभासदांना बोलावून हवे ते विषय मंजूर केल्याचा आरोप शिंदे यांनी तक्रारीत केला.

बँक खड्डय़ात घालायला निघाले होते

यासंदर्भात संदीप शिंदे म्हणाले की, जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेवर आली तेव्हापासून ही बँक खड्डय़ात घालण्याचा निर्णय जणू त्यांनी घेतला होता अशी शंकाच आता लोकांच्या मनात निर्माण झाली होती. एसटी कर्मचारी हवालदिल झाले होते. गेल्या आठ महिन्यांपासून आम्हाला कर्ज मिळत नव्हते. अशातच सर्वसाधारणसभेत जे पोटनियम बदलायचे होते. त्यांची माहिती सभासदांना दिली नाही. यासंदर्भात आपण सहकार आयुक्तांकडे तक्रार दिली होती.

महत्त्वाचे निर्णय

n सर्वसाधारण सभेत बेकायदेशीरपणे मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची वेळ आली आहे.
n गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द.
n सदावर्ते दांपत्य एसटी बँकेवर तज्ञ संचालक म्हणून राहू शकणार नाहीत.