विद्यापीठातील ई-पडताळणी सेवा तत्काळ सुरू करा; युवासेनेची मागणी

परदेशात उच्च शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणाऱया विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पडताळणी करणाऱया मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवरील ‘ई-पडताळणी (ई-व्हेरीफिकेशन)ची लिंक तत्काळ सुरू करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाने केली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ही सेवा बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यापीठाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बहुसंख्य विद्यार्थी हे नोकरीसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असतात. परदेशात जाण्यासाठी आवश्यक असणाऱया संबंधित देशाच्या व्हिसासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थी हे ऑनलाईन पडताळणीसाठी वेबसाईटवर गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र अपलोड करतात. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यास ‘पडताळणी प्रमाणपत्र’ ई-मेलद्वारे पाठवले जाते.

यासंदर्भात युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन  ई-पडताळणी सेवा त्वरीत पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्याना कागदपत्रे तातडीने देण्यात यावीत तसेच विद्यापीठाची पूर्ण संगणकीय प्रणाली स्वतः विकसित करून ठेकेदारी पद्धत बंद करावी, अशी मागणी केली.

 

विद्यार्थ्यांची गैरसोय

सर्व कागदपत्रांची पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची यादीही मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर विद्यार्थी हे मंत्रालयात जाऊन पडताळणी प्रमाणपत्रावर शिक्का मिळवतात. हे पडताळणी प्रमाणपत्र व्हिसा मिळवण्याच्या प्रकियेत अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु ‘ई-पडताळणी’ची लिंकच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.