मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’ परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई विद्यापीठात मागील दोन वर्षांपासून रखडलेली आणि संशोधक विद्यार्थ्याना पीएचडी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘पेट’ परीक्षा लवकरच होणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून तयारी करण्यात येत असून लवकरच या परीक्षेसंदर्भातील जाहिरात जारी केली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मागील एक महिन्यापूर्वी झालेल्या सिनेट सभेमध्ये रखडलेल्या पेट परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर विद्यापीठाचे  प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी ही परीक्षा लवकरच घेतली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार विद्यापीठाकडून परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले असून लवकरच या परीक्षेचे वेळापत्रक आणि जाहिरात जारी केली जाणार आहे.

मागील वर्षभरापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने पेट परीक्षा घेण्याबाबत पाठपुरावा केला होता. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येण्याची मागणी युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे आणि परशुराम तपासे यांनी विद्यापीठाकडे केली होती. युवासेनेच्या या मागणीला अखेर यश आले आहे.

पदव्युत्तर उमेदवारांना दिलासा

विद्यापीठाच्या विविध विभागांसह विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱया असंख्य पदव्युत्तर उमेदवारांना ही परीक्षा देता येत नव्हती. त्यामुळे अनेकांना पुढे पीएचडीला प्रवेश घेता आला नाही. तर दुसरीकडे काही उमेदवारांना पीएचडी नसल्यामुळे आपल्या पदोन्नती आणि अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, मात्र आता ही परीक्षा लवकरच होणार असल्याने यासंदर्भातील तयारी करणाऱया उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.