आंतरराष्ट्रीय क्रीडाविद्यापीठाची फाईल बंद का केली?माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांचा राज्य सरकारला सवाल

शैक्षणिक, सांस्पृतिक आणि औद्योगिक नगरी असलेल्या पुण्यनगरीने क्रीडानगरी म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. या क्रीडानगरीत देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्माण व्हावे, यासाठी मी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या,  मात्र दुर्दैवाने आमचे सरकार पडले अन् आलेल्या नव्या सरकारने ही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची फाईल बंद करून ठेवली. विकासाच्या गप्पा मारणाऱया विद्यमान सरकारने ही क्रीडा विद्यापीठाची फाईल बंद का केली? असा सवाल राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आलेल्या सुनील केदार यांनी बुधवारी क्रीडा पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यमान राज्य सरकारच्या क्रीडा धोरणावर चौफेर हल्ला चढविला. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रातील पुण्यात होण्यासाठी मी विधानसभेत एकमताने कायदाही मंजूर करून घेतला. यूजीसीकडून मास्टर्स, डिग्री कोर्सेस मंजूर करून आणले. यावर तज्ञ समितीची नियुक्तीही केली. याचबरोबर पुलगुरू नियुक्तीचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. इमारती आणि पायाभूत सुविधा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संपुलात असल्याने येथे केवळ वर्ग सुरू होणे बाकी होते. मात्र, दुर्दैवाने आमचे सरकार पडले आणि ही आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची महत्त्वाकांक्षी योजना नव्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवली, असा आरोपही केदार यांनी केला.

 

क्रीडा विद्यापीठ स्थलांतरित करण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीचा सर्व आराखडा तयार झाला होता. सर्व मान्यता घेऊन केवळ वर्ग सुरू करणे बाकी असताना राज्यातील सरकार बदलले आणि क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला. पुण्यात सर्व आराखडा तयार असताना केवळ आम्हाला श्रेय मिळू नये म्हणून हे क्रीडा विद्यापीठ अचानक दुसऱया ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला याहून दुर्दैव ते काय? मात्र आमचे सरकार आल्यावर पुन्हा एकदा वर्षभरातच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची योजना पुण्यातच मार्गी लावू, असा निर्धारही सुनील केदार यांनी व्यक्त केला.