पूँछ हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली; माजी पाकिस्तानी कमांडो आणि लष्कर कमांडोचा समावेश

जम्मू-कश्मीरमधील पूँछ येथे 4 मे रोजी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयितांची नावे आणि छायाचित्रे आता समोर आली आहेत.  पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो इलियास ऊर्फ फौजी, दुसरा लष्कर कमांडर अबू हमजा आणि तिसरा पाकिस्तानी दहशतवादी हदून यांचा या संशयितांमध्ये समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाचा एक जवान विक्की पहाडे शहीद झाला होता. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यासोबतच लष्कराने त्यांच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 20 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सलग पाचव्या दिवशीही सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरूच आहे.

 

कुलगामध्ये पुन्हा चकमक

कुलगाममधील रेडवानी पाइन भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. याआधी मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्यांमध्ये दहशतवादी संघटना लश्करचा टॉप कमांडर बासित डार होता. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. कश्मीरमध्ये अनेक लोकांच्या हत्येत त्याचा हात आहे. तर ठार झालेला दुसरा दहशतवादी फहीम अहमद हा होता. फहीम दहशतवाद्यांना लागेल ती मदत करत होता, अशी माहिती उघड झाली आहे.

गेल्या वर्षी सुरनकोटमध्ये हल्ला

गेल्यावर्षी 21 डिसेंबर रोजी सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात 5 जवान शहीद झाले. ही घटना 4 दहशतवाद्यांनी घडवली होती. दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाईन असॉल्ट रायफलमधून स्टीलच्या गोळ्या झाडल्या होत्या. या पोलादी गोळ्या लष्कराच्या वाहनांच्या जाड लोखंडी पत्र्यांमधून आरपार जाऊन सैनिकांना लागल्या होत्या. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

4 मे रोजी काय घडले

पूँछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान जखमी झाले होते. उपचारादरम्यान विक्की पहाडे या जवानाचा मृत्यू झाला. हा हल्ला पूँछमधील शाहसीतार भागात झाला. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन गाडय़ांवर अंधाधुंद गोळीबार केला. यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दोन्ही वाहने सनई टॉपकडे जात होती. दहशतवाद्यांच्या गोळ्या वाहनाच्या पुढील आणि मागच्या काचांमधून गेल्या