ठसा – दत्ता टोळ

>> प्रशांत गौतम

जुन्या पिढीतील ज्येष्ठ बालसाहित्यकार, चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक दत्ता टोळ (89) यांच्या निधनाने दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे. या दोन्ही क्षेत्रांत समांतर कार्य करणारी एक पिढी होती, त्यातीलच ते एक होत. ऑगस्ट 2024मध्ये पुण्याची अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करते आहे. या संस्थेच्या जडणघडणीच्या प्रवासाचे ते एक महत्त्वाचे साक्षीदार होते. दत्ता टोळ नावाचा एक तरुण सोलापूर जिह्यातून बार्शीसारख्या ग्रामीण भागातून 1953च्या सुमारास मनाशी ऊर्मी बाळगून पुण्यात येतो. मुलांसाठी काहीतरी करण्याची मनात जिद्द असतेच. मुलांसाठी काही लिहावे, त्यावर आपली उपजीविका चालावी, असे स्वप्न उराशी बाळगतो. ही कल्पना प्रत्यक्षात येणे किती कठीण आहे, याचा त्याला पदोपदी अनुभव त्याला येत जातो.1957च्या सुमारास विद्यार्थीदशेत असताना महाविद्यालयीन अंकात लेखन प्रसिद्ध होऊ लागले. पदवीधर होताच लेखन ‘विशाल सह्याद्री’, ‘केसरी’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांच्या रविवार पुरवणीतून बालकुमारांसाठी जोमाने लिहू लागले. निश्चय टिकवण्यासाठी ते सातत्याने लिहू लागले. पंचविशी उलटली नसतानाही त्यांच्या ‘जादू संपली’ या बालकथासंग्रहाच्या हस्तलिखितास पुरस्कारही मिळाला. आकाशवाणीवर व्यंकटेश माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालगोपाळ विभागात ग्रामीण मुलांसाठी कार्यक्रम सादर करता येऊ लागले. मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यावर वर्षभरातच त्यांनी चित्रमय कथाकथन करून सादर केले. यथावकाश पुणे मनपात नोकरी मिळाली व मुख्य लेखापाल या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांनी सुरुवातीच्या काळात ‘अमरेंद्र दत्त’ या टोपण नावाने लेखन केले. बाल आणि कुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची ‘अंक मोजू या’, ‘अट्टी गट्टी फू’, ‘अमृतपुत्र विवेकानंद’, ‘असे होते नामदार गोखले’, ‘आपले बापू’, ‘आळश्यांचा गाव’, ‘इतिहासातील सोनेरी पाने’ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘वादळवाटेवरील सोबती’ हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले होते. त्यांना पेंद्र-राज्य सरकारचे 11 पुरस्कार मिळाले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या विविध पदांवर ते कार्यरत होते. टोळ हे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. ते नातू फाऊंडेशनचेही विश्वस्त आहेत. इ.स. 2000 साली नगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये 150 बालवाचनालये सुरू केली.

आम्ही जिंकलो, आळश्यांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजक कथा, उपेक्षित मने, एक मन एक रूप (पुरस्कारप्राप्त पुस्तक), एक होते चक्रमपूर, एका वेडय़ाने अनेकदा (कथासंग्रह), ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट (कादंबरी, सहलेखक ः अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जय मृत्युंजय, जादूची करामत, जादू संपली (कादंबरी), जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्यकथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादूर शास्त्राr, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

सेलू येथील1992 साली झालेल्या अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त ‘दशपदी’ ही स्मरणिका प्रकाशित झाली होती. त्यात दत्ता टोळ यांचा ‘मी आणि माझे बालसाहित्य’ या विषयांतर्गत त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात ते म्हणतात- मुलांची वाचनाची आवड कमी झाली आहे असं आपण हल्ली वारंवार म्हणतो, ऐकतो, पण त्यामागची कारणं कुणी शोधायचा प्रयत्न केला आहे का? तो जर केला तर असं लक्षात येतं की, सर्वात महत्त्वाचं कारण पालकांची वाचनाकडे होणारी उपेक्षा हे ठरतं. आपलं मूल सुसंस्कृत होण्याकरिता, एक रसिक व्यक्ती बनण्याकरिता त्याच्या हातात लहाणपणीच पुस्तपं द्यायला हवं, त्याला जाणीवपूर्वक वाचनाची आवड लावायला हवी हे बहुसंख्य पालक लक्षात घेत नाहीत. टोळ पुढे म्हणतात- मुलांच्या वाचनाच्या आवडीवर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक दूरदर्शन आहे हे जसे कारण आहे तसेच बालसाहित्यातून मुलांना नवीन काहीच दिले जात नाही. म्हणून सकस बालसाहित्य निर्मितीची आज गरज आहे असे सांगून ते पुढे म्हणतात, ग्रामीण भागातील मुलांसाठी निश्चितपणे वेगळे बालसाहित्य असण्याची जरुरी आहे. सवंग श्रद्धास्थान ओरबाडणारे बालसाहित्य नको हा विषय त्यांनी आपल्या बालसाहित्यविषयक भूमिकेत विस्ताराने मांडला होता.