ईडनवर विश्वविक्रमोत्सव; पाठलागाचा आणि षटकारांचा विश्वविक्रम पंजाबने मोडला

जॉनी बेअरस्टॉ आणि शशांक सिंगच्या फटकेबाजीने ईडन गार्डन्सवर ऐतिहासिक विजयच नव्हे तर विश्वविक्रमोत्सव साजरा केला. पंजाबने कोलकात्याच्या 262 धावांचा विश्वविक्रमी पाठलाग चक्क 8 चेंडू राखून केला तर दुसऱया डावात विश्वविक्रमी 24 षटकारांची आतषबाजी करत सामन्यात 42 षटकारांचा नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला.

आज ईडनवर अद्भुत षटकारबाजी पाहायला मिळाली. कोलकात्याने फिल सॉल्ट (75) आणि सुनील नारायणच्या (71) 62 चेंडूंतील 138 धावांच्या भागीच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 261 अशी अभूतपूर्व धावसंख्या उभारलेली, पण या धावसंख्येचा पंजाबच्या बेअरस्टॉ-शशांक जोडीने सहज पाठलाग करत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात दुद्रय़ा डावातील सर्वोच्च धावसंख्याही उभारली. गेल्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजच्या 259 धावांचा पाठलाग करत विश्वविक्रम रचला होता तर आज 13 महिन्यांनी पंजाबने तो मोडून टाकला. तसेच पंजाबने दुसऱया डावातील सर्वोच्च 262ही धावसंख्या उभारली. त्याचबरोबर बेअरस्टॉने 48 चेंडूंत 108 धावांची नाबाद खेळी करताना 9 षटकार तर शशांकने 68 धावांत 8 षटकार ठोकत डावात 24 षटकारांचा नवा विश्वविक्रमही स्वतःच्या नावावर केला. हैदराबादने याच मोसमात दोन सामन्यात एका डावात 22 षटकार ठोकले होते. ते आज पंजाबने मागे टाकले. बेअरस्टॉ-शशांकने कोलकात्याच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवताना 37 चेंडूंत 84 धावांची भागी रचत पंजाबला आयपीएलमधील सर्वोत्तम विजय मिळवून दिला. सलामीवीर प्रभसिमरननेही 20 चेंडूंत 54 धावा ठोकल्या होत्या. त्याआधी कोलकात्याने 18 षटकारांचा वर्षाव करत 4 बाद 261 अशी धावसंख्या उभारली होती.