मिंधे गटाच्या खासदाराचा डाव फेल; वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकाचा अर्ज बाद

maval-lok-sabha-constituency

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले नाशिक येथून आणून संजय वाघेरे आणि उरण येथील संजोग रवींद्र पाटील यांना मिंधे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले. पाटील यांचा अर्ज भरताना तर मिंध्यांच्या खासदाराच्या जवळच्या दोन व्यक्ती उपस्थित होत्या. त्यापैकी एकाच्या खिशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मिंध्यांचा लोगो असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यामुळे मिंध्यांनी रडीचा डाव खेळल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, यापैकी संजय वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मिंध्यांचा डाव फेल झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेल्या 38 उमेदवारांपैकी 35 जणांचे अर्ज वैध ठरले असून, तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. तसेच अर्ज माघार घेण्याची मुदत 29 एप्रिल असून, त्याचदिवशी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.

आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (26 एप्रिल) सकाळी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी झालेल्या छाननीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे-पाटील, मिंधे गटाचे खासदार बारणे, वंचितच्या माधवी जोशी यांच्यासह 35 उमेदवारांचे 46 अर्ज वैध ठरले असून, तीन उमेदवारांचे 4 अर्ज अवैध ठरले आहेत. दि. 29 एप्रिलला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्याचदिवशी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

यांचे अर्ज ठरले अवेध

संजय सुभाष वाघेरे (स्वतःचे नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत नाही), राजेंद्र मानसिंह छाजछिडक (शपथपत्र दोषपूर्ण), विजय विकास ठाकुर (अनामत रक्कम भरली नाही).