बसच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काळाचौकी येथे घडली. पवनकुमार (40) आणि नितीन साहू (19) अशी दोघांची नावे होती.

नितीन आणि पवनकुमार त्यांच्या दुचाकीने परळहून काळाचौकी येथे जात असताना गं. द. आंबेकर मार्गावरील दीपक ज्योती टॉवरच्या समोर एका बसने त्यांना धडक दिली. त्या धडकेत भाजी विक्री करणारा पवनकुमार आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला नितीन दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी केईएम इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी पवनकुमार यांना दाखलपूर्व मृत घोषित केले, तर नितीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.