आधी आरोप, मग माफी; ‘माझ्यावरील राग मोदींवर काढू नका’, म्हणत भाजप उमेदवाराचे क्षत्रिय समाजापुढे लोटांगण

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातच बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील क्षत्रिय समाज भाजपविरोधात एकजूट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या राज्यांमध्ये क्षत्रिय समाज भाजपविरोधात आंदोलनही करत असून याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीच्या निकालातही दिसण्याची शक्यता आहे. गुजरातच्या राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार परषोत्तम रुपाला यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधान याला कारणीभूत आहे.

Parshottam Rupala हे पाटीदार समाजाचे नेते आहेत. ब्रिटीश शासन काळामध्ये क्षत्रिय समाजाने त्यांच्यापुढे गुडघे टेकले अशा स्वरुपाचे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे परषोत्तम रुपाला यांच्या आणि भाजपविरोधात क्षत्रिय समाज आक्रमक झाला आहे. क्षत्रिय समाजाच्या लोकांनी परषोत्तम रुपाला यांची सभा उधळण्याचाही प्रयत्न केलेला. तसेच क्षत्रिय महिला रुपाला यांच्या विरोधात उपोषणालाही बसल्या आहेत. एवढेच नाही तर गुजरातमध्ये धर्मरथ काढून आणि भगवे झेंडे घेऊन क्षत्रिय समाज भाजपच्या सर्व उमेदवारांच्या विरोधात उतरला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

23 मार्च रोजी राजकोटमध्ये दलित समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना परषोत्तम रुपाला यांनी क्षत्रिय समाजाविरोधात विधान केले होते. याचा व्हिडीओही समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात, “इंग्रंजांनी आपल्यावर राज्य केले. त्यांनी आपल्याला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आपले राजेही झुकले. त्यांनी (राजांनी) इंग्रंजांसोबत बसून तुकडेही तोडले आणि आपल्या मुलींची लग्नही त्यांच्यासोबत लावून दिली. परंतु सर्वाधिक अत्याचार होऊनही आपल्या रुखी (दलित) समाजाने धर्मही बदलला नाही आणि इंग्रजांपुढे झुकलेही नाही.”

 

मोदींवर राग काढू नका

परषोत्तम रुपाला यांच्या विधानामुळे क्षत्रिय समाजाने भाजपविरोधात मोर्चा उघडला. याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात बसल्याची चाहूल लागताच परषोत्तम रुपाला यांनी क्षत्रिय समाजाची माफी मागितली आहे. जसदनमध्ये आयोजित एका सभेमध्ये त्यांनी क्षत्रिय समाजापुढे लोटांगण घातले आणि माझ्यावरील राग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काढू नका, असे आवाहनही केले. माझ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करू नका. मी माझी चुकी मान्य करतो. परंतु मोदींविरोधात क्षत्रिय समाज उभा राहणे योग्य नाही. कृपया याचा पुनर्विचार करा, असे आवाहन परषोत्तम रुपाला यांनी केले.