मुंबई-पुणे महामार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या खासगी बसला आग

मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळी ‘बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एका खासगी बसला आग लागली. आग लागली तेव्हा बसमधून 36 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, वैभव ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. मावळ तालुक्यातील अधे गावाजवळ आली असताना धावत्या बसचे टायर फुटले आणि आग लागली. बस चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवल्याने पुढचा अनर्थ टळला.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच आयआरबीचे गस्त पथक, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि वडगाव-मावळ वाहतूक पोलिस यांच्यासह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे व्हिडीओही समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत.