एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्सची सामूहिक सुट्टी; 70 हून अधिक उड्डाणे रद्द

air india express

बुधवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्सनी आजारपणाचे कारण देत सामूहिक सुट्टी घेतली आहे. यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शेवटच्या क्षणी सुमारे 300 वरिष्ठ केबिन क्रू मेंबर्सनी आपण आजारी असल्याची तक्रार नोंदवली आणि आपले मोबाइल फोन बंद केल्यानंतर तब्बल 79 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली.

एअर इंडिया एक्स्प्रेस व्यवस्थापन सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनकडे आहे. नवीन रोजगार कराराला अनेकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी सामूहिक सुट्टी करणाऱ्या क्रूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, सूत्रांनी सांगितले.

‘आमच्या केबिन क्रूच्या एका गटानं काल रात्रीपासून शेवटच्या क्षणी आजारी पडल्याचं व्यवस्थापनाला कळवण्यास सुरुवात केली, परिणामी काही विमानांची उड्डाण उशिरानं झाली तर काही रद्द करण्यात आली आहेत. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत असताना आणि प्रश्न सोडवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे.

‘या अनपेक्षित त्रासाबद्दल आम्ही आमच्या प्रवाशांची मनापासून माफी मागतो आणि या परिस्थितीत सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतो’, असंही ते म्हणाले.

या गोंधळामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा दुसऱ्या तारखेला कोणत्याही अधिक रकमेशिवाय प्रवास करण्याची हमी, विमान कंपनीनं दिल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

अनेक प्रवाशांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन त्यांची फ्लाइट अचानक रद्द झाल्याची तक्रार केली. तसंच यामागील कारण कंपनीकडून आधी कळवण्यात आलं नाही, असंही म्हटलं आहे.