खोटे बोलण्याच्या स्पर्धेत नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल; संजय राऊत यांचा टोला

महाविकास आघाडीचे नगर येथील उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे सभा घेण्यात आली. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांना चांगलेच झोडपून काढले. तसेच महाविकास आघाडीचे निलेश लंकेसारखा जनतेच्या समस्या मांडणारा नेता संसदेत पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निलेश लंके यांच्यातील शिवसैनिक अजून जागा आहे. त्यांच्यातील भगव्याच्या विचार अजूनही दिसून येत आहे. येथील जनतेच्या समस्या लोकसभेत मांडण्यासाठी लंके यांच्यासारखा नेता संसदेत पोहचला पाहिजे. ज्यावेळी निलेश लंके यांचे नाव जाहीर झाले, त्यावेळी महाविकास आघाडीचा हा खासदार संसदेत जाणार हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीला काही ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही. त्यापैकी ही जागा एक आहे. या मतदारसंघात निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे. शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

सध्याच्या खासदारांनी संसदेत सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे किती प्रश्न उपस्थित केले आहेत, असे सवाल त्यांनी केला. त्यांचे आयुष्य ऐषोआरामाचे आहे. आता हे चालणार नाही. राज्याला असे नेते आता नको आहेत. राज्यासह देशात परिवर्तनाची लाट आहे. या लाटेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नेता संसदेत पोहचला पाहिजे. पूर्वीच्या काळी पंतप्रधान येणार असले की आठवडाभर आधी कळायचे. मात्र, आता ते राज्यात मुक्काम करतात, तरी समजत नाही. गेल्या 20 दिवसात त्यांनी 28 सभा घेतल्या आहेत. आणखी सभा ते घेणार आहेत. गेल्या 10 वर्षात त्यांनी चांगले काम केले असते तर प्रचारासाठी असे वणवण फिरयाची वेळ त्यांच्यावर आली नसती. आता ते भाजपचे प्रचारमंत्री झाले आहेत.

आता त्यांचा पराभव कोणीही रोखू शकणार नाही. ते रोज खोटे बोलत आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटे बोलण्याच्या स्पर्धेत त्यांना सुवर्ण पदक मिळेल. अमेरिका आणि रशियाला जमणार नाही अशा पद्धतीने ते खोटे बोलत आहे. त्यांना देशात हुकूमशाही आणयाची आहे. रशियातील पुतीन यांच्याप्रमाणे त्यांना देशात करायचे आहे. लोकशाहीच्या नावाखाली त्यांना हुकूमशाही आणायची आहे. त्यांना विरोधकांना तुरुंगात डांबायचे आहे. आगामी काळात फक्त मोदी निवडणुकीत उभे राहतील आणि जनतेने त्यांना मतदान करावे, अशा पद्धती त्यांना आणायची आहे. या हुकूमशाहीविरोधात आमली ही लढाई आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री विखे किती पक्षात फिरले आहेत. आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे. आम्ही अनेक सरकारे पाहिली मात्र, एवढे निघृण सरकार पाहिले नाही. भाजपने पक्ष फोडून बेकायदा सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फोडले आणि दुसऱ्यांच्या हातात हे पक्ष दिले. अशा प्रकारची हुकूमशाही देशात सुरू असेल तर देशाचे भवितव्य गंभीर आहे. त्यामुळे जनतेने आता महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच निवडून दिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिशाला तेजस्वी संविधान दिले आहे. मूलभूत हक्क आणि अधिकार दिले. मोदी आणि त्यांच्या पक्षाला हे संविधान बदलायचे आहे. 400 पारची घोषणा देत त्यांना संविधान बदलायचे आहे, ते आपल्याला होऊ द्यायचे नाही. या निवडणुकीत केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. तर नरेंद्र मोदी विरोधी पक्षात बसणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.